Breaking News

राहुल गांधींच्या आरोपाला पंतप्रधान मोदींचे सव्याज उत्तर शेरो शायरीतून साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम

अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवित देशाची एकता धोक्यात आणली जात असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ईशान्य भारतात, जम्मू आणि काश्मीरात, तामीळनाडूत अशांतता निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप करत मोदी हे देशाचे पंतप्रधान नाही तर राजा असल्यासारखे वागत असल्याची टीका करत परराष्ट्र नीतीत भारत सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.

राहुल गांधी यांनी केलेल्या या टीकेला आणि चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा, इन्हे आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड देंगे”, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. देशातील कोरोनाच्या फैलावास काँग्रेसचे जबाबदार असून काँग्रेसनेच मजूरांना मोफत तिकीटे काढून देत त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी दबाव आणल्याचे सांगत मुंबईत काँग्रेस नेते यूपी आणि बिहारच्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी जाण्यास सांगत होते. त्यासाठी त्यांना पैसेही देत होते. तुमच्या राज्यात जा आणि कोरोना फैलवा असं सांगत होते, असा गंभीर आरोप मोदींनी केला. त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अहंकारी संबोधत जोरदार हल्ला चढवला. प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा नाही. सवाल तुमच्या नैतिकतेचा आहे. इतके वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही देशातील जनता तुम्हाला का नाकारत आहे? आम्ही एक निवडणूक हरलो तरी एको सिस्टिम काय काय करते. तुम्ही एवढ्या निवडणुका हरल्यानंतरही तुमचा अहंकार जात नाही. अधिर रंजन चौधरी यांनी अनेक शेर ऐकवले. मीही ही संधी घेतो. अहंकाराचीच गोष्ट निघाली आहे. त्यावर मीही तुम्हाला एक शेर ऐकवतो, असे म्हणत, मोदी म्हणाले की,

“वो जब दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ, नही मानोगे तो वो दिन में नकाब ओढ लेंगे, जरुरत हुई तो हकीकत को थोडा बहोत मरोड लेंगे, वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा, इन्हे आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड देंगे…” असा उपरोधिक टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला.

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या पराभवाचा पाढा वाचताना म्हणाले की, मला वाटंते काँग्रेसने पुढील १०० वर्षे सत्तेत न येण्याचा निश्चय केलेला दिसतोय. त्यामुळे आम्हीही १०० वर्षे सत्तेत राहण्याचा निश्चय केल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगत पुढे म्हणाले की, तुम्हाला लोकांची नस माहीत असती, तुम्ही जनतेत मिसळले असते तर तुम्हाला या गोष्टी कळल्या असत्या. तुमच्यापैकी अनेक लोकांचे सुई-काटे २०१४ मध्ये अडकलेले आहेत. त्यातून तुम्ही बाहेर पडत नाहीत. तुम्ही स्वत:ला एका मानसिक अवस्थेत अडकवून ठेवलं आहे. लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. काही आता ओळखत आहेत. तर काही भविष्यात ओळखतील. नागालँडच्या लोकांनी १९८८ मध्ये काँग्रेसला मत दिले होते. त्याला आता २४ वर्षे झाली. ओडिसाने १९९५ मध्ये तुम्हाला मत दिले होते. त्यालाही २७ वर्ष झाली असून अजूनही ओडिसात तुमची एन्ट्री झाली नाही. गोव्यात १९९४ मध्ये तुम्हाला पूर्ण बहुमत मिळाले होते. त्याला २८ वर्षे वर्ष झाली गोव्याने तुम्हाला स्वीकारले नाही. १९८८ साली त्रिपुराने मत दिले होते. ३४ वर्षापूर्वी. अजूनही तिथे तुम्ही सत्तेत नाहीत. यूपी, बिहार आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे हाल आहेत. म्हणजे शेवटी १९९५ मध्ये ३७ वर्षापूर्वी मतदान केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये १९७२ मध्ये म्हणजे ५० वर्षापूर्वी मतदान केले होते असे सांगत तामिळनाडूच्या लोकांनी १९६२ म्हणजे ६० वर्षापूर्वी संधी दिली होती. तेलंगना बनविण्यचे श्रेय घेता पण त्यांनीही तुम्हाला संधी दिली नाही. झारखंडचा जन्म झाला २० वर्षे झाले. त्यांनीही पूर्णरुपाने तुम्हाला स्वीकारले नाही. तिथे मागच्या दरवाजाने तुम्ही सत्तेत असतात, असे चिमटे त्यांनी काँग्रेसला काढले.

यावेळी काँग्रेसच्या खासदारांकडून मोदी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत त्यांच्या उलट प्रश्नांची सरबती सुरु केली. त्यावेळी मोदी यांनी पुन्हा काँग्रेसला चिमटा काढत जे मुद्दे सभागृहाच्या बाहेर मांडायचे आहेत ते तुम्ही सभागृहात मांडत असल्याची टीका करत या सभागृहाचा उपयोग तुम्हाला जनतेच्या प्रश्नावर करता आला असता असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *