Breaking News

पंकजा मुंडे यांच्याकडून रमेश कराड यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादीच्या कराडांची माघार

बीड-मुंबई : प्रतिनिधी

लातूर विधान परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांच्या माईर या संस्थेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासंदर्भात दबाव आणत महामंडळाचे अध्यक्षपदाचे आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सुरु झाली आहे. मात्र या कृतीमुळे राष्ट्रवादी पक्ष अडचणीत तर आलाच शिवाय रमेश कराड यांची राजकीय कारकीर्द सुध्दा धोक्यात आली आहे.

भाजपामधून अवघ्या आठवड्यापूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले रमेश कराड यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. आज ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुले राष्ट्रवादीचा उमेदवारच मैदानात राहिला नाही. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनाच पुरस्कृत करावे लागले. रमेश कराड राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसबंधू आहेत. १४ वर्षे भाजपामध्ये राहिल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने हा पंकजा मुंडे यांना मोठा धक्का होता.

परंतु, आज कराड यांनी उमेदवारी अर्जच मागे घेतल्यामुळे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना जोरदार धक्का दिल्याचे बोलले जाते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कराड यांनी तोडपाणी करणाऱ्यांबद्दल काय बोलावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राज्य विधान परिषदेच्या येत्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीआधीच भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. नाशिक आणि परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपाचे बंडखोर उमेदवार उतरल्याने शिवसेनेलाही स्वबळाचा नारा प्रत्यक्षात उतरवताना बरीच मेहनत घ्यावी लागणार असल्याचे बोलले जाते.

धक्का निकालाचा असतो

धनंजय मुंडे यांच्याकडे याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली हा कसला धक्का.. धक्का निकालाचा असतो, असे सांगितले. भाजपा उमेदवारी देत नाही म्हणून कराड आमच्याकडे आले. ताकदीचा नेता म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली. आज ज्या पद्धतीने त्यांनी उमेदवारी मागे घेतली याला कोणते राजकारण म्हणायचे? आपण उमेदवारी मागे घ्यायची आणि वर आरोप करायचा, असे ते म्हणाले. अशोक जगदाळे आता आमचे पुरस्कृत उमेदवार असतील, असेही मुंडे यांनी सांगितले.

नाशिक, परभणीत शिवसेनेला धक्का

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर भाजपाने नाशिक आणि परभणीत शिवसेनेलाही दणका दिला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाने आपला उमेदवार दिला नसला तरी तेथे भाजपाचे बंडखोर उमेदवार परवेज कोकणी यांनी आपली अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे तेथे आता तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष परवेज कोकणी यांच्यात चुरस आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा जिंकणे तितकेसे सोपे राहणार नाही, असे कळते.

परभणीतही भाजपाचे बंडखोर उमेदवार सुरेश नांगरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळेत पोहचू न शकल्याचे कारण देत आपली उमेदवारी कायम राखली. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश देशमुख, शिवसेनेचे विपुल बाजोरिया तर भाजपाचे बंडखोर उमेदवार सुरेश नांगरे यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे येथेही शिवसेनेला अडचणींचा सामना खेळावा लागणार आहे.

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *