Breaking News

काँग्रेसला “हात” दाखवित राजेंद्र गावितांनी गळ्यात घातली “कमळ” ची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदीयाच्या रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राज्यात राजकिय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. यातील पालघर येथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपला उमेदवार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शोधाशोध सुरु असतानाच काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. तर गावीत यांनीही काँग्रेसमध्येच असल्याची ग्वाही देत अखेर काँग्रेसला हात दाखवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

पालघरचे खासदार चिंतामण वणगा यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. मात्र वणगा यांच्या कुटुंबियातील कोणाला या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजपचे पक्षश्रेष्ठी फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे वणगा यांच्या कुटुंबियाला भाजपकडून वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे अखेर वणगा कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेनेही वणगा यांचे श्रीनिवास वणगा यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

शिवसेनेच्या कृतीमुळे भाजपची चांगलीच राजकिय कोंडी झाली. त्यामुळे भाजपला आयत्यावेळी उमेदवाराची शोधाशोध सुरु करावी लागली. सुरुवातीला राज्याचे आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे घाटत होते. परंतु त्यांनी असमर्थता दर्शविल्याने त्यांच्याऐवजी नव्या उमेदवाराची शोधाशोध सुरु झाला. त्यात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत हे भाजपला गळाला लागले.

राजेंद्र गावित यांच्या या संभावित नावाच्या चर्चेने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गावित यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याची ग्वाही दिली. मात्र दिवस मावळताच राजेंद्र गावित यांनी काँग्रेसला बायबाय करत अखेर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थित भाजपच्या कमळाची माळ गळ्यात घातली.

शिवसेनेने असे करायला नको होते-मुख्यमंत्री

पालघरची जागा ही वास्तविक भाजपची जागा आहे. तसेच खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकिट देण्यासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरले होते. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनीही त्यांनाच तिकिट देण्यासंदर्भात होकार कळविला होता. तरीही वणगा यांच्या कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत प्रवेश केला. शिवसेनेकडून या पध्दतीच्या कृती अपेक्षा नव्हती. त्यामुळे शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

विजय आमचाच-रावसाहेब दानवे

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये जरी शिवसेनेने उमेदवार दिलेला असला तरी वणगा यांच्या पाठोपाठ पालघरमधील कोणताही कार्यकर्ता, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींमधील कोणीही त्यांच्या सोबत गेले नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदार आमच्यासोबत असल्याने पालघरमध्ये विजय आमचाच असल्याचा विश्वास दर्शविला.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *