Breaking News

दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी दूध भुकटीला ३ रूपयाचे अनुदान राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पदुम मंत्री महादेव जानकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या दुधाला निश्चितपणे योग्य दर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल कमी दूध भुकटी तयार करण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. या परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरिता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्च २०१८ अखेर रोजी २६५०६.७० मेट्रीक टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी दूध भुकटी प्रकल्पधारकांना अधिक दूध भुकटी उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या नुसार शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील ३० दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च २०१८ मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान २० टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्या सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दुधासाठी प्रती लिटर ३ रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रती लिटर दूध रुपांतरणासाठी ३ रुपये इतके अनुदान दिल्यास खाजगी व सहकारी दूध उत्पादकांमार्फत सद्य:स्थितीत रुपांतरित करण्यात येणाऱ्या प्रती दिन अंदाजे ३६ लाख ४१ हजार लिटर दुधासाठी १ कोटी ९ लाख २३ हजार रुपये इतके अनुदान दररोज शासनाकडून दिले जाणार आहे. संपूर्ण ३० दिवसाचा कालावधी लक्षात घेता, अंदाजे ३२ कोटी ७६ लाख रुपये इतके अनुदान शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार आहे. दूध भुकटी प्रकल्पधारकांना मार्च, २०१८ मध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान २० टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यावर याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारही या निर्णयामागे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *