Breaking News

सोलापूरातील राष्ट्रवादीचे दोन आमदार शिवसेना-भाजपात माढ्यात कमळ तर बार्शीत धनुष्यबाण

सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना गळाला लावण्याचे काम केले. आता आगामी विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपा-शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारांना पक्षात ओढण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे लवकरच शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अंत्यत जवळचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपाचे कमळ हातात घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने सत्तेतील पक्षांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली असून, बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा सोपल यांनी केली आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा-शिवसेनेकडे विरोधी पक्षातील नेत्यांची आवक वाढली आहे. लोकसभेच्या तोंडावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन भाजपाने काँग्रेसला जबर धक्का दिला होता. त्यानंतर आलेल्या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपा शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीला तर पश्चिम महाराष्ट्रातच हादरे बसू लागले आहेत. मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे वजनदार नेते पक्ष सोडून गेले आहेत. सोमवारी बार्शीत स्वतःच्या निवासस्थानी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार सोपल यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी मतदार संघातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतल्याचे सांगत २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सोपल यांनी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीकडे आमदार दिलीप सोपल यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे सोपल पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. युतीच्या जागा वाटप सूत्रानुसार बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे येते. सोपल यांचे विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेतून भाजपात उडी घेतल्याने सोपल यांना मार्ग मोकळा झाला होता. यापूर्वी करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असून त्याचबरोबर साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे हे भाजपात जाणार असल्याचे बोलले जात आहे. बबनदादा शिंदे भाजपात गेले तर राष्ट्रवादीकडून त्यांचेच कट्टर विरोधक असलेल्या शिवाजी कांबळे यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *