Breaking News

भाजपा सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबईः प्रतिनिधी

राज्यातील घटनारी वृक्षसंख्येवर मात करण्यासाठी आणि वृक्ष लागवड होवून पर्यावरण संतुलन रहावे यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची घोषणा केली. मात्र या योजनेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. सदर समिती येत्या चार महिन्याच्या आत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही त्यांनी सांगितले.

२०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन फडणवीस सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबविली होती. त्यावर किती खर्च झाला व यातील किती झाडांचे संगोपन झाले यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या मोहिमेअंतर्गत वन विभागाने २८ कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील सध्या ७५ टक्के रोपे जिवंत असून २५ टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधिमंडळात मान्य केले होते. वृक्ष लागवड मोहिमेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती.
त्यावर मंत्री भरणे यांनी विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तर, चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला दिली होती. त्यानुसार, आता केवळ आठच दिवसात मंत्री भरणे यांनी विधीमंडळ सदस्यांची समिती स्थापन करून ही समिती चार महिन्याच्या आत सभागृहाला अहवाल सादर करेल, अशी घोषणा केली.
वृक्षलागवड योजनेच्या चौकशी समितीत खालील आमदारांची नियुक्ती
वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली १६ विधानसभा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत मंत्री भरणे यांच्यासह नाना पटोले (काँग्रेस), सुनील प्रभू (शिवसेना), उदयसिंग राजपूत (शिवसेना), बालाजी कल्याणकर  (शिवसेना), अशोक पवार (राष्ट्रवादी), माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी), सुनील भुसारा (राष्ट्रवादी), शेखर निकम (राष्ट्रवादी), सुभाष धोटे (काँग्रेस), अमित झनक (काँग्रेस), संग्राम थोपटे (काँग्रेस), आशिष शेलार (भाजप), नितेश राणे (भाजप), अतुल भातखळकर (भाजप), समीर कुणावर (भाजप) आणि नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) आदी १६ विधानसभा सदस्यांचा समावेश आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *