Breaking News

संभाजी ब्रिगेडबरोबर युती करत उध्दव ठाकरे म्हणाले, बरं झालं ते दूर गेले… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणं बरं असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत बरे झाले ते आमच्यापासून दूर गेले असा उपरोधिक टोला लगावत प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री कोणीही असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा चांगली हवी. मध्यंतरी केंद्राने एका निर्णयात कंत्राटी पद्धतीने सर्व काही करावं असं सांगितलं होतं. त्यावर मी, असं असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीने का नेमू नयेत अशी विचारणा केली होती. कंत्राट काढा आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान यांची नियुक्ती करा असं माझं वाक्य होतं, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिले.

एकनाथ शिंदे यांनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ असं प्रत्युत्तर दिलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले, बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो गेला. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण इतर वेळी त्यांच्या हेरयंत्रणा कार्यरत असतात, त्याप्रमाणे आमच्या भाषणाचीही नीट माहिती घेऊन बोलावं असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला.

उध्दव ठाकरे संभाजी बिग्रेडला उद्देशून म्हणाले, आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली.

महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे. हा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल, असा आपण घडवू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलेला आहात म्हणून मी तुमचं स्वागत करतो, असेही ते यावेळी संभाजी ब्रिगेडला उद्देशून म्हणाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *