Breaking News

परवडणाऱ्या घरांवरील जीएसटी कर १ टक्क्याने कमी घरे स्वस्त होणार असल्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
महानगरातील ६० चौ.मी चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील ९० चौ.मी चटई क्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर ८ टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वस्तू आणि सेवा कर परिषदेने गृहनिर्माण क्षेत्रावरचा कराचा भार कमी केल्याने सर्वसामान्य माणसाचे हक्काचे घर असण्याचे स्वप्नं प्रत्यक्षात येण्यास मदत झाली आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जीएसटी आधी वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर व्हॅट आणि सेवाकर आकारला जात असे. वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आल्यानंतर या क्षेत्रासाठी पूर्वीच्या करांचा एकत्रित भार घेऊन नवीन दर निश्चित करण्यात आला होता. परंतु सर्वसामान्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्नं आणि या क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन गृहनिर्माण क्षेत्रावरील कराचा बोजा कमी करण्यात आला.
गृहनिर्माण क्षेत्रासाठी कराचा बोजा कमी करण्याचा शासनाने व वस्तू आणि सेवा कर परिषदेने प्रयत्न केला आहे. याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
परवडणाऱ्या घरांव्यतिरिक्त बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील कराचा दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी कमी किंमत मोजावी लागेल. सरकारच्या या निर्णयामुळे घर खरेदी स्वस्त झाली असून या क्षेत्राच्या वाढीसाठी चालना मिळाली असल्याचे त्यांनी आशा व्यक्त केली.
निवासी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी
निवासी सोसायटींना पूर्वी ५ हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारल्यास वस्तू आणि सेवा कर द्यावा लागत असे. आता नवीन बदलामुळे ७५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक देखभाल शुल्क असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना वस्तु आणि सेवाकर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जमीन मालकाने टीडीआर, एफएसआय किंवा लाँग टर्म लिज द्वारे संबंधित हक्क हस्तांतरीत करून या जमीनीवर बांधण्यात आलेली घरे जर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी विक्री करून त्यावरील कर भरला असेल तर टीडीआर, एफएसआय अथवा दीर्घकालीन भाडे करारांवर वस्तु आणि सेवा कर माफ करण्यात आला आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *