Breaking News

अजित पवार यांच्या नेतृत्वाचे शरद पवार यांनी केले कौतुक शरद पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर पवार कुटुंबिय आज पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटना निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुमित्राताई पवार, प्रतिभाताई पवार, हर्षवर्धन पाटील, अशोक पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच पवार कुटुंबातील सर्व मंडळी आणि संस्थेची विश्वस्त मंडळही उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने काका-पुतण्या एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने पक्ष फुटीबद्दल काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत म्हणाले, अजितच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्था ही एक अतिशय उत्तम संस्था आहे, जिथे १ लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. आज अनेक वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर कसे भर देता येईल याचे काम सर्वांनी करायला हवे.

आज अनंतराव पवार म्हणजे माझे वडील बंधू ते अतिशय कर्तुत्ववान असे त्यांचे नेतृत्व होते. त्यांचे हस्ताक्षर अतिशय मोत्यासारखे होते. अतिशय सुवाच्च हस्ताक्षर हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी काही कारणास्तव त्यांना कॉलेज सोडावे लागले आणि ते सोडल्यानंतर आमच्या मातोश्री अतिशय कडक होत्या. शिक्षण अर्धवट सोडलेले त्यांना आवडत नसत हे तात्या साहेबांना माहीत असल्यामुळे त्यांनी कॉलेज सोडल्यानंतर लगेचच मुंबई गाठली. त्यांचे कोणतेही मित्र नव्हते ते राजकमल सूर्य मध्ये त्यांनी व्ही. शांताराम सोबत काम करत ते तिथेच जॉईन झाले आणि अनेक छोट्या मोठ्या कामात त्यांना सहकार्य करणे यात त्यांनी लक्ष घातले. काही काळानंतर आम्हीच सर्व भावडांनी आईकडे आग्रह केला की, त्यांना परत बोलवायला हवे आणि त्यांना बोलावले गेले आणि सबंध शेतीचा व्यवसाय त्यांनी सांभाळला. हे करत असताना माझी राजकारणात नुकतीच सुरुवात होती. मी नुकताच विधानसभेला उभ्या राहण्याच्या परिस्थितीत होतो. माझे वय तेव्हा २६ होते आणि आमदारकीची निवडणूक लढवायची ठरवली तर मोठे लोक विरोधक होते. तेथील एक साखर कारखाना पूर्ण ताकदीने माझ्या विरोधात उभा होता आणि त्यामुळे निवडणूक काही सोपी नव्हती. अनेकांनी ती निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळे ते यश आले पण दुसऱ्या बाजूने तात्या साहेबांनी आणि आप्पा साहेबांनी माझ्या निवडणुकीची मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि घरोघर जाऊन लोकांना मला निवडून कसे आणता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, त्यावेळी निवडणुकांना एवढा खर्च होत नसेल. परंतु जे काही व्हायचं ते संपूर्ण जबाबदारी तात्या साहेबांनी अर्थकारण हातात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने गाजावाजा न करता पार पाडली आणि मोठ्या मतांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आणि त्यात अनेकांनी हातभार लावले. परंतु तात्या साहेबांचे योगदान मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. त्यांचा स्वभाव हा माणसं जोडण्याचा स्वभाव होता ते सहकारी चळवळीत देखील काम करायचे. छत्रपती साखर कारखान्यात ते संचालक होते. कारखान्याच्या कामात त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असायचे. शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक कशी करता येईल त्यात ते बारकाईने लक्ष द्यायचे आणि या पद्धतीने गावची ग्रामपंचायत असेल, गावातील अन्य संस्था असतील, गावातील साखर कारखाना असतील किंवा निवडणुकीतील माझ्यासारखे सहकारी असतील या सर्वांमागे प्रकर्षाने पाठिंबा देत उभे राहण्याचे कर्तव्य तात्या साहेबांनी उभ्या आयुष्यावर केले आणि हे करत असताना त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही. त्यांनी सतत आमचा विचार केला. माझ्यापेक्षा सुप्रियाचा अधिक विचार ते सतत करायचे आणि अशा प्रकारचे एकावेळी वेगळे स्वभावाचे ते व्यक्तिमत्व होते.

शरद पवार म्हणाले, तात्या साहेबांचा मृत्यू ज्यावेळी झाला अक्षरशः त्याच मिनिटाला सुप्रियाच्या मुलाचा जन्म झाला त्याचे नाव विजय. विजयचा जन्म आणि तात्या साहेबांचा मृत्यू यांची वेळ एकच होती आणि त्यामुळे तात्यासाहेब गेले आणि विजयला पाहून असे वाटले की, तात्यासाहेब पुन्हा आमच्यातच आहेत. अशाप्रकारेची भावना आमच्या मनात सतत येते.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शारदा निकेतन ही संस्था मुलींसाठी मोठ्या प्रमाणात एक वेगळे काम करत आहे. जसे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने काम केले जाते तसे अतिशय चांगले काम शारदा निकेतन आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केले जाते. आज सुप्रिया जी संस्था चालवते त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी २५० मुला- मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यांचे शिक्षण सबंध केले जाते याची जाहिरात कुठे केली जात नाही. आणि अशाच अनेक संस्था अजित आणि मी किंवा पवार कुटुंबीय चालवतात. उद्दिष्ट हेच आहे की, शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला आणि व्यक्तिगत जीवनातील त्यांचे संकटे ज्ञानाच्या मार्फत दूर व्हावेत आणि त्यासाठीच अशा संस्था या काम करत आहेत. येणारी नवीन पिढी या संस्थेमुळे अनेक उत्तम कामे करू शकेल याची खात्री आज मला या ठिकाणी वाटत आहे.

शेवटी जागेची आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, ही शाखा काढण्याची एक पार्श्वभूमी आहे येथे एक सीनियर बझ नावाचा कारखाना होता या ठिकाणी तो येणार नव्हता. माझे एक मित्र होते ते आता हयात नाहीत त्यांचे नाव ललित थापर. ही त्यांचीच कंपनी होती. कागद तयार करण्याच्या क्षेत्रातील ते एक मोठे उद्योजक होते. मी त्यांना सांगितले, तुमचे कारखाने चंद्रपूरला, चंदिगड, मध्य प्रदेश, अशा मोठमोठ्या भागात आहेत तर माझ्या भागात देखील तुम्ही कारखाना काढला पाहिजे. हो-नाही म्हणत म्हणत आम्ही बैठका घेतल्या आणि विचार विनिमय करून ही कंपनी आम्ही येथे स्थापित केली आणि मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यात. पण त्यांच्या स्टाफने असे सांगितले की, येथे शिक्षणाची सोय नाही तर मग आमच्या मुला-मुलींनी करायचे काय ? तेव्हा आम्ही सांगितले की, सुरुवातीला बारामतीला विद्या प्रतिष्ठान येथे जाण्या येण्याची सोय आम्ही करू एवढेच नव्हे तर तुमची फी देखील भरू, तेव्हा त्यांनी सांगितले की, येथे देखील शिक्षण संस्था उभी करायला हवी तेव्हा या शिक्षण संस्थेचा येथे जन्म झाला. तेव्हा मी त्यांना शब्द दिला की, अशी शिक्षण संस्था काढून अशी भव्य इमारत उभारू की, लोक तेथे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतील आणि मुलांची शैक्षणिक दृष्ट्या वाढ होईल. आम्ही त्याची खात्री दिल्यानंतर आज त्याची पूर्तता होत आहे याचा मला आनंद आहे. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या इमारतीचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो आणि यातून उत्तम विद्यार्थी-विद्यार्थिनी तयार होतील, जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील. आणि पुनःश्च तुमच्या सर्वांच्या साक्षीने शाळेचे उद्घाटन झाले असे जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *