Breaking News

अंतिम वर्षाच्या परीक्षा सहज व सुलभ पध्दतीने घेणार निर्णयासाठी कुलगुरूंची समिती गठीत- मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन  सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता  येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून १३ अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठानी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली. या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर उद्या ३० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत गोवा, दिल्ली,मध्यप्रदेश,बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा  घेण्यात आला. या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,  विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ,सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *