Breaking News

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि निकाल दोन्ही ऑक्टोंबरमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरूवात तर महिना अखेरला निकाल- उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी  घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सर्व अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत झूमच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

श्री. सामंत म्हणाले, विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी काळजी करू नये,

या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व विद्यापीठ परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील असेही ते म्हणाले.

३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना  स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी  आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२०  पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले.

बैठकीत  परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल,अशा विविध विषयांवर कुलगुरू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

परीक्षा पद्धती संदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक बुधवार २ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी होईल त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५:०० वाजता बैठक होईल. या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,  विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *