Breaking News

घोषणा करण्याऐवजी हमीभावासाठी तातडीने अध्यादेश काढा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

तूर व हरबऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्र सरकारकडून हमी भाव देण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमी भाव देण्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली.

यंदा तुरीचा हमीभाव ५४०० रूपये असताना शेतकऱ्यांच्या हातात केवळ ४२०० रूपये टेकवले जात आहेत. हरभऱ्याला ४२०० रूपयांचा हमीभाव असताना केवळ ३२०० रूपये दराने खरेदी सुरू आहे. सोयाबीन खरेदीत शेतकरी अक्षरशः नागवला गेल्यानंतरही सरकारला जाग आलेली नाही. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी झाल्याच्या लेखी तक्रारी राज्यात अनेक ठिकाणी दाखल झाल्यानंतरही सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारच्या याच निष्क्रियतेमुळे शेतकरी थेट मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेत आहे. धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील मारूती धावरे नामक शेतकऱ्याने विषाच्या बाटलीसह मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दलालाने फसवणूक केल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजाराम गायकवाड नामक वयोवृद्ध शेतकरी हतबल होऊन मंत्रालयात न्यायासाठी फिरत असल्याचे दृष्य दिसत आहे. मात्र कोणीही त्यांना दाद दिली नसल्याचे सांगत एकीकडे शेतकऱ्यांचे ऐकून घ्यायचे नाही आणि दुसरीकडे त्यांना हमीभाव देण्यातही टाळाटाळ करायची असा दुट्टपी राज्य सरकारकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

परिस्थिती अशीच राहीली तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा प्रक्षोभ होऊन सरकार त्यात खाक होईल, असाही इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

 

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *