Breaking News

गृहमंत्री देशमुख, रेल्वे तिकिटांची विक्री नसताना मजूरांकडून पैसे कोण घेतय? जनतेची शंका दूर करण्याची भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारवर टीका केली व रेल्वेने कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नयेत अशी मागणी केली. या संदर्भात माधव भांडारी म्हणाले की, अनिल देशमुख जनतेची दिशाभूल करत आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून रेल्वे मंत्रालय ठिकठिकाणी अडकलेल्या मजूरांसाठी स्पेशल श्रमिक ट्रेन्स चालवत आहे. या विशेष रेल्वेगाड्या त्या त्या राज्यसरकारच्या मागणीनुसार चालवल्या जातात. अशा गाडीच्या एकूण खर्चाचा ८५% भार रेल्वे उचलत असून केवळ १५% राज्य सरकारने उचलावा अशी ह्या गाड्यांची व्यवस्था आहे. देशातल्या सर्व राज्यांनी ह्या व्यवस्थेला मान्यता दिलेली आहे. असे असताना ‘रेल्वेने मजुरांकडे तिकिटाचे पैसे मागितले’ असे म्हणणे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. रेल्वे तिकीट विक्री करत नसल्यामुळे हा मुद्दा उद्भवत नाही. रेल्वे केवळ राज्य सरकारच्या मागणीनुसार गाडी सोडण्याची व्यवस्था करत असल्याचे ते म्हणाले.
प्रवाशांची यादी अंतिम करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. राज्य सरकारने यादी करून दिलेल्या प्रवाशांना रेल्वे गाडीतून घेऊन जाते. संबंधित प्रवाशांची कागदपत्रे तपासून खातरजमा करण्याचे कामदेखील राज्य सरकारची यंत्रणा करते. रेल्वेचा ह्या सर्व विषयात प्रवाशाशी थेट संबंध येतच नाही. त्यामुळे मजुरांकडे कोणी पैसे मागत असेल तर त्याची जबाबदारी पूर्णपणे राज्य शासनाची आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच ह्या मुद्याचे स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे की रेल्वे तिकिटे विकत नसताना व प्रवासी कोण असावा हे ठरवण्याचे काम राज्य सरकार करत असताना मजुरांकडून पैसे कोण घेत आहे? आणि अशा पद्धतीने जमा केलेला पैसा कोणाकडे जात आहे ह्यावर सरकार काही देखरेख ठेवत आहे का? ह्या प्रश्नाची उत्तरे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख ह्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.
विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी रेल्वेवर टीका करणारा व्हिडिओ जारी केला त्याच दिवशी बुधवारी राज्याच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातून २५ रेल्वेगाड्या मजूरांना घेऊन गेल्याची नोंद केली व परराज्यात परतणाऱ्या मजुरांच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन चांगले झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्याचा उल्लेख करून, मंत्रिमंडळातील ह्या चर्चेच्या वेळेला आपण काही अन्य कामात व्यस्त होतात का असा सवालही भांडारी यांनी गृहमंत्र्यांना विचारला आहे व त्याचबरोबर रेल्वेने गोरगरीब मजुरांसाठी देऊ केलेली माफक दरातील व्यवस्था सुद्धा, ‘बाहेरच्या बाहेर विकण्याची व्यवस्था करणाऱ्या महाविकास आघाडीचा कारभार अजब आहे’ अशीही टीका माधव भांडारी यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *