Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही,… २ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल

राज्यात ‘माविम’ अंतर्गत १० हजार ५०० गावात, २९५ शहरात एकुण १ लाख ६५ हजार बचत गटांमार्फत २० लाख महिला जोडल्या असून राज्य शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २ कोटी महिलांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे अभियान ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे ३५ हजारहून अधिक उपस्थिती असलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील (यड्रावकर), माजी आमदार सुरेश हाळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महाव्यवस्थापक माया पाटोळे यांच्यासह ६०० महिला सरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराणी ताराबाई यांनी आपल्या अतुलनीय शौर्यातून माताभगिनींचे रक्षण केले. जनसेवेत आदर्श निर्माण करून अहिल्याबाई होळकर यांनी आपला ठसा उमटवला तर सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि आपण त्यांचेच वारसदार आहोत याचा सार्थ अभिमान आहे. सर्वच क्षेत्रात महिला भक्कमपणे उभ्या आहेत. आता शासनाने महिला धोरणही जाहीर केले आहे. राज्यातील महिला अधिक सक्षम होत असून महिला बचतगट हे १०० टक्के कर्जांची परतफेड करणाऱ्या महिलांचा गट आहे. म्हणूनच महिला बचतगटांचे खेळतं भांडवल दुप्पट केले. सीआरपींचे मानधनही दुप्प्पट केले. अंगणवाडी व मदतनीसांची रिक्त पदे भरली जात आहेत. त्यांचे मानधन वाढीसह अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला जात आहे. आशा सेविकांनाही लवकरच न्याय मिळेल. महिला व बालविकास विभागासाठी ३ हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सांगून महिलांसाठी एसटी प्रवासासाठी ५० टक्के सूट देणारे आपले पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला धोरणातून महिलांना प्रशासकीय व अर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महिला शेतकरी, शेतमजूर, उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राहक अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाला महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी उत्पादन, ब्रँडींग, विक्रीसाठी मदत करण्याच्या सूचना देऊन महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व पीडीतांसाठी समुपदेशन याबाबत निर्णय घेतले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ४ कोटी महिलांच्या सर्व आरोग्य तपासण्या केल्या. महिलांना समानतेच्या वाटेवर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनातून महिलांना सक्षम केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून ३५ टक्के अनुदानाच्या योजनेतून जास्तीत महिलांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांना बसमधे ५० टक्के सवलत, आनंदाचा शिधा, लेक लाडकी योजना, येत असलेली मोफत शिक्षणाची योजना यातून शासन महिलांसाठी भरीव कार्य करीत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिलांमधे संघर्षाचे संस्कार केले. त्यातूनच अन्यायाविरूद्ध वचक निर्माण झाला महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोगतात मागील काही वर्षांपासून महिलांच्या राहणीमानात बदल झाला असून आता त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भारताला महासत्ता बनविण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री तसेच राज्यात मुख्यमंत्री यांनी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले. खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हयातील महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली.

कोल्हापूर जिल्हयासाठी ४ हजार ५० कोटी रूपयांच्या विविध विकासकामांची घोषणा

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पंचगंगा पूर नियंत्रणासाठी ३२०० कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यातील निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ७५० कोटी रूपयांचा प्रकल्प आराखडा सादर झाल्याचे त्यांनी सांगितले. नगरोत्थानमधून इचलकरंजी शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रूपये देण्याची घोषणा त्यांनी केली. इचलकरंजीमधील साध्या यंत्रमागांसाठी १ रूपया व ऑटोलूमसाठी ७५ पैसे वीजबिलात सूट देण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी घोषित केला. तर कोल्हापूर मधील शेतकऱ्यांसाठी केलेल्या २०० पट पाणीपट्टीच्या वाढीला त्यांनी स्थगिती दिली. कोल्हापूर येथे खंडपीठही लवकरच सुरू करणार असून त्यासाठी उच्चस्तरावर बोलणी सुरू असल्याचे सांगितले. मागणी केल्यानूसार कोल्हापूर मधील उर्वरीत एसटी वाहतूकीतही महिलांसाठी ५० टक्के सवलतीची घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमात हाकणंगले येथे एमआयडीसी जाहीर झाली आहे त्यांचा परवाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार धैर्यशील माने यांचेकडे सुपूर्द केला. कोल्हापूर मधील ४०५० कोटी रूपयांच्या विकासकामांची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हयात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते विविध महिला लाभार्थींना साहित्याचे व अनुदानाचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण झाले. महिला मेळाव्यात मुख्यमंत्री यांचे स्वागत उपस्थित महिलांनी टाळयांच्या गजरात केले.

राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह थोर महिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. ३५ हजारहून अधिक महिलांच्या विराट महामेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या व महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

१५ कोटी रूपयांच्या विकासकामांचे महिला मेळाव्यात ऑनलाईन लोकार्पण

कोल्हापूर जिल्हयातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी (MH-51) या कार्यालयाचा आरंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. तसेच एकूण १३.५० कोटी रूपयांच्या इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन झाले. एकूण रू. १.४४ कोटी किंमतीच्या जिल्ह्यातील महसूल विभागातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना १४ वाहनांचे वाटप करण्यात आले. तसेच भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था संचालित येथील नवीन इमारत व मोफत उपचार योजनेचे ऑनालाईन उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *