Breaking News

भाजपामधील एकाधिकारशाहीच्या विरोधात आमदार डॉ. देशमुखांचा राजीनामा पक्षांतर्गत असलेली धुसफूसीमुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या तयारीत

मुंबई : प्रतिनिधी

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत आपले राजकिय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक आयाराम रांगेत आहेत. मात्र भाजपमधील पक्षांतर्गत एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमधून बाहेर पडणाऱ्यांची सुरुवात झाली असून भाजपचे नागपूर जिल्ह्यातील कटोलचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी आपल्या आमदाराकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे आज दिला.

लवकरच ते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेवूनही प्रत्यक्ष राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

निवडणूकीच्या काळात सत्तास्थानी आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली होती. परंतु सत्तास्थानी येवून ४ वर्षे झाली तरी स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. तसेच विदर्भाच्या विकासासाठी अनेक मोठ-मोठे उद्योग प्रकल्प आणण्याचे आश्वासन देवूनही अद्याप कोणताही मोठा उद्योग आणण्यात आला नसल्याने विदर्भातील परिस्थिती आहे तशीच आहे. याप्रश्नी आ.देशमुख यांनी वारंवार जाहीररित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच कोकणातील नाणार प्रकल्पावरूनही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे आमदार डॉ.देशमुख हे भाजपमधून बाहेर पडणार असल्याची अटकळ बांधली जात होती.

तसेच त्यांच्या या विरोधाला पक्षात फारशी किंमत दिली गेली नसल्याने अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्याचे भाजपमधून सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी जळगांवच्या प्रभारी पदी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची नियुक्ती करण्यात आल्याने धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच पक्षांतर्गत लोकशाही पध्दतीचा निषेध केला. त्यामुळे ते ही भाजपमधून लवकरच बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापार्श्वभूमीवर पक्षात आयारामांची जशी संख्या वाढत आहे. तशीच गयारामांचीही संख्या वाढण्याची चिन्हे दिसत असल्याचे मत भाजपमधीलच एका पदाधिकाऱ्याने खाजगीत बोलताना व्यक्त केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *