Breaking News

४ तारखेला कोरेगांव-भीमा आयोगासमोर शरद पवार हजर राहणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी
दोन वर्षापूर्वी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोरेगांव भिमा चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हजर राहणार आहेत. चार तारखेला ते साक्ष देण्यासाठी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे यापूर्वीच आयोगाला कळविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
कोरेगांव भिमा येथील दंगलींच्या संदर्भात यापूर्वीच शरद पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र आता पुन्हा आयोगाला त्यांची साक्ष घेण्याची आवश्यकता वाटल्याने आयोगाने त्यांना साक्षीसाठी विचारणा केली. त्यानुसार पवार यांनी ४ एप्रिल रोजी साक्ष देण्यासाठी उपलब्ध असल्याचे कळविले. त्यानुसार शरद पवार हे साक्ष देण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फेब्रुवारी २०२० मध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कोरेगांव भिमा येथील दंगलीच्या संदर्भात दंगल पूर्वनियोजित असल्याचे वक्तव्य करत पुणे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे विवेक विचार मंचच्या सागर शिंदे यांनी आयोगाने शरद पवार यांचा जबाब घ्यावा अशी मागणी केली होती.
याबाबत नवाब मलिक म्हणाले की, यासंदर्भात पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट असून यासंदर्भात पवारांनी लिखित स्वरूपात साक्ष दिलेली आहे. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची चौकशी करण्यासाठी आयोगाची फक्त स्थानका केली. मात्र त्यापेक्षा काही केले नसल्याचा आरोप केला.
आयोगाची मुदत ८ एप्रिल रोजी संपतेय
कोरेगांव भिमा चौकशी आयोगाची मुदत ८ एप्रिल २०२० रोजी संपत आहे. या आयोगाला जानेवारी २०२० मध्ये तीन महिन्याची शेवटची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता मुदत संपता संपता ६ ते ८ लोकांना साक्षीसाठी आयोगाने बोलाविले आहे. कोरोनामुळे या साक्ष घेण्याच्या कामात अडथळा आल्याने २९ मार्च पर्यंत आयोगाच्या कामकाजाला सुट्टी दिली असून ३० मार्च २०२० पासून साक्षीसाठी अनेकांना बोलविण्यात आले आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *