Breaking News

रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर पलटवार करत ठाकरेंना म्हणाले, १९ मार्चला उत्तर देणार भास्कर जाधव हा चिपळूनचा लांडगा

नुकतीच खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम हा ‘झपाटलेला’ सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

यावेळी बोलताना रामदास कदम यांनी भास्कर जाधवांवर निशाणा साधताना म्हणाले, भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा, हा बाडगा बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला आणि नंतर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आला. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा बाडगा आज रामदास कदम पेक्षा स्वत:ला निष्ठावान समजतो आहे. हा ‘एहेसान फरामोश’ आहे. त्याला निवडणुकीसाठी गाड्या मी पाठवल्या होत्या. १९९५ मध्ये मी बाळासाहेबांना सांगून तिकीट द्यायला लावली होती. २००९ मध्ये उद्धव ठाकरेंनी माझ्या पराभवाची सुपारी दिली होती. त्यामुळे तू निवडून आला. पण आता गाठ माझ्याशी आहे, आता पुढच्या निवडणुकीत तुला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला.

रामदास कदम यांनी पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका करत आव्हान देताना म्हणाले, खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला. पण उद्धव ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी, योगश कदमांना पाडू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ही खासगी कंपनी बनवून ठेवली होती. ते शिवसैनिक, आमदार, खासदारांना नोकर समजत होते, अशी टीका करत खोके आम्ही नाही तर तुम्ही घेतले, असा प्रत्यारोपही केला.

धनुष्यबाण चिन्हाबाबात बोलताना भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांना जीभ हासडायची भाषा ठाकरेंना शोभत नाही, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला बाहेरून माणसं आली होती. त्यांच्या कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी उध्दव ठाकरे गटातील नेत्यांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा दिसतो. पण त्यामागचे अनेक चेहरे मला माहित आहेत. केशव भोसलेंचा ड्रायव्हर मी होतो असं तुम्ही म्हणालात ते सिद्ध करून दाखवलं तर मी तुमच्या घरी भांडी घासायला येईन असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली. ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर असं तुम्ही म्हणता पण ज्याच्या हाती धनुष्यबाण तो राम असतो तुम्ही दुर्दैवी आहात तुमचे हात बरबटलेले आहेत अशी टीकाही केली.

गद्दार, चोर, खोके हे तुमचे शब्द आहेत. मात्र आज सांगतो खोक्यांमध्ये आम्ही अडकलो नाही तुम्ही अडकलेला आहात. कावीळ झालेल्या लोकांना सगळं जग पिवळं दिसतं तसंच आहे. खोके तुम्ही घेता म्हणून तुम्हाला खोके दिसतात. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं का? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला.

नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा तुम्ही किती घाबरला होतात. तुमची…. पिवळी झाली होती. कारमध्ये मला बसवल्याशिवाय तुम्ही कधी बाहेर पडत नव्हतात. मला सगळ्या गोष्टी माहित आहेत असा दावाही रामदास कदम यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकलीत आणि एखाद्या हुकूमशहा सारखी तुम्ही वागत आहात असा आरोप करत आत्ता जे तुम्ही केलं आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं असतं? असा सवालही केला.

भास्कर जाधव नावाचा लांडगा तुम्हाला आवडतोय. नया मुल्ला जोरसे बांग देता है.. तसं तुम्हाला हा बाडगा आता कडवा आणि एकनिष्ठ वाटतो. निवडणूक लढवण्यासाठी टेंपोच्या टेंपो मदत मी पाठवली होती हे हा बाडगा विसरला. १९९५ ला तुला तिकिट कुणी दिलं होतं भास्कर जाधव हे तू विसरलास का? योगेश कदम यांना आव्हान देण्यासाठी तुम्ही आला असलात तर असल्या १०० सभा घेतल्या तरीही काहीही फरक पडणार नाही असे खुले आव्हानही भास्कर जाधव यांना रामदास कदम यांनी दिले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *