Breaking News

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, पवार साहेबांच घर आहे ते तिथे असणारचं ना… मंत्रिपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सिल्वर ओकवर गेलेल्या अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण

खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रात्री अजित पवार हे पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर गेले. यावरून राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधान आले. त्यावर आज नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांच्या निवासस्थानी जाण्याचे कारण स्पष्ट करत पवार साहेबांचं घर आहे ते तिथे असणारच ना असे सांगत आमच्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे काल ब्रिच कँडी रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळात अजित पवार यांनी घरी जाऊन त्यांच्या काकी अर्थात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांची विचारपूस केली. याविषयी खुद्द अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, काल काकींचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. मला दुपारीच जायचं होतं ऑपरेशन झाल्या झाल्या, परंतु थोडासा विलंब लागला. कारण खातेवाटप जाहीर झाल्याने मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो. अधिवेशन सोमवारपासून असल्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांशीही बोलायचं होतं, असंही सांगितले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी फोन केला, त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी सांगितलं की दादा आम्ही आता सिल्व्हर ओकला निघालो आहोत, तर तू तिथेच ये. मला काकींना काहीही करुन भेटायचंच होतं, राजकारण आपल्या जागी, शेवटी आपली भारतीय संस्कृती आहे, परिवाराला आपण महत्त्व देतो. पवार कुटुंबियांची परंपरा आम्हाला आजी-आजोबांनी शिकवली आहे, नंतरच्या पिढीत आई-वडील, काका काकींनी शिकवली आहे. म्हणून अर्धा तास भेटायला गेलो, असं स्पष्ट सांगितले.

तसेच अजित पवार यांनी सांगितले, मी काकींची विचारपूस केली, ख्याली खुशाली जाणून घेतली. पुढचे २१ दिवस काळजी घ्यावी लागेल. माझ्या अंतर्मनाने सांगितलं, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. म्हणून मी तिथे गेलो. पवार साहेब तिथे होते, सुप्रिया तिथे होती, काकी तिथे होत्या, काही अडचण आहे का? असा उलट प्रश्नच अजित पवारांनी पत्रकारांना विचारला.

पवार साहेबांचं घर आहे, मी रात्री साडेआठला तिथे गेलो, त्यामुळे ते तिथे असणारच ना. मधल्या काळातील घडामोडींवर चर्चा झाली नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *