Breaking News

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीसंदर्भात अजित पवार म्हणाले… म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीबाबत व्यक्त केली.

पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. पवारसाहेब ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरीता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावरही पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

या बैठकीला मला, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आले नाही याचा अर्थ ही राजकीय चर्चा नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं असंही ते म्हणाले.

तर मविआकडे स्थानिक स्वराज्य संस्था येतील – अजित पवार

आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल असे वैयक्तिक मतही त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील संभाव्य युतीबाबत त्यांनी व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र पणे लढवणार असल्याचे स्टेटमेंट प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. कुणी काय स्टेटमेंट द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे. पण उद्याच्या निवडणूकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्हयाला अधिकार द्यावा असेही वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले.

आपण इथे बसून ठरवलं तर उदाहरणार्थ गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर इथली परिस्थिती काय असते ते माहित नसते. आपण त्यांच्यावर सोडलं तर ते या सगळ्याचा साखल्याने विचार करतात. तिथले लोक रोज राजकारण आणि समाजकारण करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. परंतु सध्या तरी प्रत्येकजण आपापला पक्ष वाढण्याच्यादृष्टीने प्रयत्न करतोय असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी २ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे.

Check Also

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्ये आमने-सामने तणावपूर्ण परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविण्यात यश

राज्यसभेच्या निवडणूकीच्या पाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक जाहिर झालेली असताना आणि त्यातच राज्यातील १४ महापालिकांसह २५ …

Leave a Reply

Your email address will not be published.