Breaking News

प्रसाद लाड यांच्या आरोपावर सुभाष देसाई म्हणाले, खबरदार…

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडत सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले.
महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. २१ सप्टेंबर २०२१ मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

प्रसाद लाड यांच्या आरोपांना उत्तर देताना माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, प्रकल्प वर्षभरापूर्वी गेला असता तर माध्यमांनी आज का बातम्या दिल्या? दोन दिवसांनी भूमीपूजन होणार असून ही तारीख आम्ही दिलेली नाही. हेच खरं असून यापासून पळ काढता येणार नाही. प्रसाद लाड यांच्या टक्केवारीच्या आऱोपावर बोलताना देसाई यांनी संतापून म्हणाले, खबरदार, असले आरोप सहन करणार नाही. ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावेत. किती बालीशपणे बोलत आहेत.

भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीसाठीचा २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमधील बडोदा येथे उभारण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण सचिव अजयकुमार यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता असून, तत्पूर्वी हा समारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकल्पातून भारतीय हवाई दलासाठी विमानांची निर्मिती होईल. तसेच तेथे तयार झालेल्या विमानांची निर्यातही होणार आहे. यामुळे भारतीय विमाननिर्मिती क्षेत्राला चालना मिळणार आहे,’ असे संरक्षण सचिव अजयकुमार यांनी सांगितले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने एअरबस कंपनीशी २१ हजार कोटींचा करार केला होता. त्याअंतर्गत जुन्या अ‍ॅवरो-७४८ विमानांची जागा सी-२९५ ही अत्याधुनिक विमाने घेणार आहेत. बडोद्यातील हा प्रकल्प २१,९३५ कोटी रुपयांचा असून येथे तयार होणारी विमाने प्रवासी वाहतुकीसाठीही वापरली जाऊ शकतात, अशी माहिती कुमार यांनी दिली. विमानाच्या ९६ टक्के भागांची निर्मिती भारतात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यात सध्यातरी विमानाच्या इंजिनाचा समावेश नाही.

दरम्यान प्रसाद लाड यांनी आरोप करताना म्हणाले की, येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठं प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झालं आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांचं पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *