Breaking News

बैठकीत शरद पवार यांची सूचना, काम थांबवा आणि बैठक घ्या प्रशासन आणि गावकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्याची उदय सामंत यांनी दाखविली तयारी

रत्नागिरीतल्या बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या माती परिक्षणाला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसत असून याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच असे प्रकल्प सुरू करताना सरकारने स्थानिकांशी चर्चा करावी अशी सूचना उदय सामंतांबरोबरच्या बैठकीत केल्याचे सांगितल्याचे नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी बोलताना सांगितले.

आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई इथे माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर बळाचा वापर करण्यात आला. या विषयाबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यावर स्थानिक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यातून काय निष्पन्न होते हे पाहण्याची गरज आहे. यासाठी उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका दाखवली. इतर काही प्रश्न असतील तर त्यावरही मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी सामंत यांनी दाखवली.

यावेळी शरद पवार म्हणाले, बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे, अशी आमची तक्रार होती. त्याबाबत आज उदय सामंत यांनी माहिती दिली. अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं ते म्हणाले. तसेच बारसूमध्ये रिफायनरी प्रस्तावित असून सध्या येथील मातीचे परिक्षण केले जात असल्याचंही स्पष्ट केले. त्यावर मी (शरद पवार) त्यांना हे काम सध्या थांबवून विरोधक आणि शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी उद्या बारसूमध्ये यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले, अशी माहितीही दिली.

यावेळी त्यांना बारसू रिफायनरी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारण्यात आलं असता शरद पवार म्हणाले, एखादा महत्त्वाचा प्रकल्प कोकणात होत असेल आणि त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर सरकारने स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भू्मिका आहे. अशा विरोधाची नोंद राज्य सरकारने घ्यायलाच हवी, सरकारने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगितले.

बारसू येथील प्रकल्पावरून ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी वेगवेगळी भूमिका बघायला मिळाली. याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं. आमची ठाकरे गटाच्या नेत्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. उद्या यासंदर्भात बारसू येथे बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला तर आनंदच आहे. मात्र, यावर तोडगा नाही निघाला, तर यावर चर्चा करता येईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *