Breaking News

ऋतुजा लटके यांनी आयुक्तांची भेट घेत केली विचारणा, शिवसेना न्यायालयात

राज्यात शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेकरीता पोट निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संभावित उमेदवार ऋुतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी मुंबई महारपालिकेतील नोकरीचा राजीनामा देऊनही त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर न करण्यात आल्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करण्यात येत असून शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीत तणाव निर्माण होत आहे. त्यातच आज ऋतुजा लटके यांचा राजीनामाप्रश्नी मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. मात्र आता याप्रश्नावर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना आणि ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यात घातलेल्या अटीमुळे त्यांचा राजीनामा लटकलेला असल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. मात्र, ऋतुजा लटके या मुंबई पालिका सेवेत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जवळपास एक महिना अगोदर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. पण अद्यापही लटके यांचा राजीनामा पालिकेने मंजूर केला नाही. आपल्या राजीनामा पत्रात ऋतुजा लटके यांनी जर मी निवडणुकीत पराभूत झाले तर मला पुन्हा मुंबई पालिकेत सेवेत घ्यावे, अशी अट राजीनामा पत्रात घातल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासकीय सेवेतील राजीनाम्यात घातलेली अट कायदेशीर नाही असा सल्ला तज्ज्ञांनी पालिकेच्या प्रशासनाला दिल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय झाला नाही. आता ऋतुजा लटके यांनी सुधारित अर्ज दिला असल्याचे सांगितले आहे. त्यात कुठलीही अट नाही अशी माहिती मिळत आहे. आता मूळ राजीनामा पत्रात सुधारणा करणारा अर्ज आहे की, नव्याने अर्ज दिला याबाबतही तेढ निर्माण होऊ शकते. राजीनामा अर्जावरील तारखेनुसारच नियमानुसार नोटिस कालावधी पूर्ण होतो का हेही पहावी लागणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

ऋतुजा लटके यांना मंत्रीपदाची लालूच दाखवून त्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ऋतुजा लटके ह्या आमच्या संपर्कात आहेत. परंतू सरकारच्या दबावामुळे पालिका प्रशासन त्यांचा राजीनामा स्वीकारत नाही असा आरोपही परब यांनी केला.

तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही पत्रकारांशी बोलताना विहित कालावधीत आतापर्यंत राजीनामा मंजूर होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने याप्रश्नी आम्ही न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत. त्याचबरोबर आमच्याकडे प्लॅन बी ची तयारी असल्याचेही स्पष्ट केले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *