Breaking News

एकाने १० तास ठेवले, त्याने दुसरीकडे पाठविले- अखेर अंत, आयुक्त- मुख्यमंत्रीसाहेब हे थांबणार कधी ? राजावाडीला गेलेल्या कोरोना पेशंटबाबतचा ह्दयद्रावक अनुभव .- नामदेव उबाळे माजी नगरसेवक घाटकोपर

मी राजावाडी हॉस्पीटलमध्ये रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या आनंदविकास चाळ येथील वय वर्ष ५७, पॉझीटिव्ह रूग्णास ६ तास झाले तरी दाखल करत नाही म्हणून प्रत्यक्ष गेलो.डीन डॉक्टर विद्या ठाकुर, डॉक्टर कल्पेश केणे यांच्याशी बोललो.सहा तास पॉझिटिव्ह पेशंट कठड्यावर झोपला आहे. त्याच्या बाजूला इतर लोक बसतात, यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले साहेब बेडच खाली नाही, सायं ९.३० ला २, पेशंटला डिस्चार्जड होईल. मग अॅडमीट करून घेवू . मी सदर बाब त्याच्या दोन्ही मुलांना सांगून त्यांना तेथेच थांबवून घरी आलो. पुन्हा पेशंटच्या मुलाचा रात्री १० वा. फोन आला अजून अॅडमीट नाही केले. म्हणजे पेशंटला रस्त्यावर १० तास झाले होते.
त्यानंतर मी पुन्हा डीनला फोन केला. त्यांनी सांगितले मी व्यवस्था केली आहे, त्यांना मुलुंडला मिठागर येथील शाळेत आपण सोय केलेली आहे. तिकडे पाठवते. मी पुन्हा त्या मुलांना धीर दिला व त्याना थोडा वेळ वाट बघण्यास सांगितले, दहा मिनिटात पेशंटच्या मुलाचा फोन आला. अॅम्बुलन्स आली वडिलांना घेवून निघालो. आम्ही पुढे निघतो. मी ठीक आहे म्हटलं. त्याच अॅम्बुलन्स मध्ये इतर ठिकाणच्या पेशंटला नेण्यासाठी रात्री १२ वाजले, त्यांची मुले अगोदरच पोहचली होती. तेव्हा त्याना कळले वडीलांची तब्येत चिंताजनक झाली आहे. मुलुंडच्या डॉक्टरांनी सांगितले केस आमच्या हाताबाहेर आहे. तुम्हाला शक्य असेल तर खाजगी हॉस्पीटलमध्ये घेवून जा. त्या मुलांचा मला परत रात्री १२.१५ ला याबाबत फोन आला व ही सविस्तर माहिती दिली. मी पुन्हा मुलुंड डॉक्टरांशी बोललो. या क्षणी ते शक्य कसे होईल, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. पुन्हा अर्ध्या तासाने मुलांचा फोन आला व त्याने टाहो फोडला, काका माझे पप्पा गेले हो. यांनी उशीर केला.. हे वास्तव मला ऐकायला मिळाले. रात्री दीड वाजता मी मुलुंड ड्यूटीवरील पोलीस अधिकारी यांच्याशी मृतदेहाच्या बाबतीत चर्चा केली. मयत यांच्या नातेवाईकांना कळवावे लागेन, सकाळी अंत्यसंस्कार केले तर चालतील का?एवढ्या रात्री कसा मृतदेह ताब्यात घेणार. त्यानी नियमांवर बोट ठेवले. त्यांनी सांगितले मृतदेह असा उघडा ठेवता येणार नाही. आताच अंत्यसंस्कार करावे लागतील जवळच्याच स्मशानभूमीत करावे लागतील त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनची noc लागणार. विशाल जंगम छोटा मुलगा म्हणाला, काका मला वडिलांच्या निधनाचे वृत्त सहन होत नाही. मी बाईकवरून हायवेवरून नाही जावू शकत रात्रीचे दीड वाजले होते. मी त्याला धीर देत म्हटले बाळा आता पर्याय नाही. त्याच्याही मनात अनेक शंकाने काहूर माजले. मी वडिलांना स्पर्श केला काका, कोणीही धरण्यास नव्हते मग मी हात लावला. काका काही प्रोब्लेम नाही ना. मी धीर दिला. जड मनाने नाही म्हटले व त्यानंतर मुले बाईक वरून n.o.c साठी पंतनगरला आली.अडीच वाजता मुलुंडला गेली. मी सांगितलं कुणा नातेवाईकांना कळवा. ते म्हटले मामाला कळवले. मामानी सांगितले माझी बिल्डींग सील आहे येता येणार नाही तुम्ही अंत्यसंस्कार महापालिकेच्या नियमाप्रमाणे करून घ्या. आईला न कळवता दोन्ही भावांनी पहाटे ५ ला अंत्यसंस्कार उरकून घेतला.
या रात्रीने मला सुन्न केले, रडवले. विचाराला जागा उरली नाही.
हा हलगर्जीपणाचा बळी की व्यवस्थेचा हा प्रश्न मला पडला. पण यावर विचार करायला सध्या वेळ नाही. हे रोज घडू लागले आहे, म्हणून स्वयंसेवकांनी जागृक राहून एकमेकांना मानसिक आधार तरी द्या. असे अनेक कुटूंबं आहेत. घरातील व्यक्तींचा मृत्यू आजारपणामुळे,वयोमानानुसार झाला तरी पॉझीटिव्ह दाखवण्यात आले. इथे पण शंका उपस्थित होते. या कामी लोकप्रतिनिधी जागृक असायला पाहीजे. प्रशासनाला याचा जाब विचारायला हवा. पण तसे होताना दिसत नाही.
मी सध्या ह्याच बाबी कडे लक्ष देत असून पॉझीटिव्ह व कोरोन्टाईन असणारे लोक भयभीत आहेत. त्याना सध्या मानसिक आधार व मेडिकल उपचाराची गरज आहे. त्यांना २४ तास मदतकार्य करीत आहे. आपणही सर्वांनी शक्य असेल तर करावे. वेळ कधी कुणावर येईन सांगता येणार नाही.
या दु:खी कुटूंबियांना त्यांच्या विनंतीवरून कोरोन्टाईन करून घेतले व त्यांच्याही टेस्ट व योग्य ते उपचार करण्यास संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी वर्गास सांगितले.
– नामदेव उबाळे, मा नगरसेवक
9920235893

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *