Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश सर्व शासकिय कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना लवकर सोडले

मुंबईसह राज्यातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच मुंबईकरांना आपापल्या घरी सुरक्षित आणि वेळेत पोहोचता यावे यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर बस, एसटी उभ्या करण्याच्या सुचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत असे म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एनडीआरएफ तसेच एसडीआरएफ च्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले आहे असेही यावेळी जाहिर केले.

हवामान खात्याने कालपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह राज्याला दिला होता. त्यानंतर काल सकाळपासून आज संध्याकाळ पर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच कालच्या तुलनेत आज सकाळपासून मुसळधार मुंबईत पडत आहे. त्यामुळे मुंबई उपनगरिय वाहतूक अर्थात लोकल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. तर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने ट्रॅफिक जाम झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संध्याकाळी मुसळधार पावसामुळे आणखी संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. तर विधिमंडळाचे कामकाज थांबविण्याची विनंती केली.

तत्पूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत सभागृहाचे कामकाज थांबवावे आणि शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांना लवकर घरी सोडावे अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनीही थोरात यांची मागणी मान्य करत सभागृहाचे कामकाज थांबविले आणि सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात येणार असल्याचे जाहिर केले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *