Breaking News

बुलेट ट्रेन रद्द करून त्याचा निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

ठाणेः प्रतिनिधी
दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे प्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरुन रेल्वेत चढलो तरी जीवंत परत येऊ का? अशी धाकधूक प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पुल आणि रस्त्यांवरील पुल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारत नाही. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे गरजेचे आहे. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर प्रथम बुलेट ट्रेन रद्द करुन तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार असून जाहीरनाम्यामध्येही तसे नमूद करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
दरम्यान, सीएसटी पुल दुर्घटनेतील मृतांना २५ लाख आणि जखमींना १५ लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
गेल्या ५ वर्षांत रेल्वे प्रवाशांची आणि रेल्वेसेवेची दुर्दशा झाली आहे. कर्जत-कसारा ते सीएसटी; पनवेल ते सीएसटी आणि विरार ते चर्चगेट असा प्रवास करणारे चाकरमानी जीव मुठीत धरुन प्रवास करीत असतात. गेल्या १ वर्षात मुंबईमध्ये तीन पुल कोसळले. पण, त्याचे या राजकीय व्यवस्थेला कसलेही सोयरसुतक नाही. हा अपघात प्रवाशांच्या चुकीमुळे झाला असल्याचा दावा हे लोक करीत आहेत. यावरुन त्यांच्यातील मग्रुरीच दिसून येत आहे. रेल्वेच्या सुधारणा करण्याऐवजी प्रवाशांनाच दोष देण्याची ही कृती अत्यंत असंवेदनशील आणि बेशरमपणाची असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबई ठाण्यातील रेल्वेचे पुल, रेल्वेशी संलग्न असलेले पुल, रस्त्यांवरील पुल यांना आता जवळपास ५० ते ७० वर्षे झालेले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.त्यामध्ये टिळक पुल असो अगर कोपरीचा पुल! कोपरीचा पुल तर अत्यंत जर्जर झालेला असून रेल्वेच्या विभागिय व्यवस्थापकांनी बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना ५ नोव्हेंबर २०१५ रोजी पत्र लिहून या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. या पत्राला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकांचे जीव जाण्याचे वाट हे सरकार पहात आहे का? गरीबांचा जीव हा जीव नसतो का? धोकादायक फलक लावण्याचेही औदार्यही दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वे, रेल्वेशी संलग्न आणि रस्त्यावरील सर्व पुलांचे ऑडीट करुन त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करत सकाळी आणि सायंकाळी रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करावे, अशी मागणी ही त्यांनी केली.
दरम्यान, एकीकडे दररोज दोनशे अपघात होत आहेत. या दुर्घटनांमध्ये लोक मारले जात असताना जगाच्या बाजारात हा देश विकण्यासाठी हे सरकार बुलेट ट्रेन आणू पहात आहे. हा प्रकल्प मुंबई, ठाणे-पालघरवासियांच्या काही कामाचा नसतानाही तो लादला जात आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा आणि त्यासाठी वापरण्यात येणारा निधी मुंबई प्रांतीय रेल्वे सुधारणेसाठी वापरावा, अशी मागणी करुन आमचे सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन तत्काळ रद्द करुन तो निधी ठाणे, मुंबई रेल्वेसेवा आणि रेल्वेशी संलग्न असलेल्या सेवांसाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *