Breaking News

‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र आले शिवदर्शन-अभिजीत साबळेंचा नातू शिवदर्शन आणि शिवाजी साटमांचा मुलगा अभिजीत पुन्हा एकत्र

मुंबई  : प्रतिनिधी

रियल लाईफमध्ये असो वा, रील लाईफमध्ये एखाद्याचे एखाद्याशी सूर जुळले की त्यांची चांगलीच गट्टी जमते. चंदेरी दुनियेतही असे काही दिग्दर्शक कलाकार आहेत त्यांचे सूर इतक्या चांगल्या प्रकारे जुळले आहेत की ते वारंवार एकत्र दिसतात. मराठी सिनेसृष्टीतही अशी बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. शिवदर्शन साबळे आणि अभिजीत साटम हे त्यापैकी एकच उदाहरण म्हणायला हरकत नाही. ‘लगी तो छगी’ या सिनेमाच्या निमित्ताने शिवदर्शन-अभिजीत ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

‘सीआयडी’ फेम शिवाजी साटम यांचा चिरंजीव असलेल्या अभिजीत साटम हे नाव सध्या छोट्या पडद्यावर खूप गाजतंय. हाच अभिजीत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वेगळ्या धाटणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिजीतने शिवदर्शनच्या ‘कॅनव्हास’ या पहिल्या मराठी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यापूर्वा अभिजीतने हिंदी सिनेमांमध्येही लहान सहान भूमिका केल्या होत्या. आता ‘लगी तो छगी’च्या निमित्ताने शिबू आणि अभिजीत पुन्हा एकत्र आले आहेत. निर्माते शिवदर्शन साबळे, अजित पाटील, दिप्ती विचारे आणि स्वाती फडतरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.‘कॅनव्हास’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ या चित्रपटांनंतर मध्यंतरीच्या काळात शॉर्टफिल्म्स आणि नाटकांमध्ये बिझी असलेला शिबू ‘लगी तो छगी’द्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्याकडे वळला आहे.

शिवदर्शनची खरी ओळख सांगायची तर तो सुप्रसिद्ध शाहिर साबळे यांचा नातू. आजोबा शाहिर साबळे तसेच वडिल देवदत्त साबळे ही मराठीतील दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वे मागे असतानाही शिवदर्शनने आतापर्यंत स्वबळावरच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिजीत चांगला मित्र तर आहेच, पण एक उत्तम अभिनेताही असल्याने तो या चित्रपटामधील भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारू शकतो याची खात्री असल्यानेच त्याची या सिनेमासाठी निवड केल्याचं शिबू म्हणाला. प्रवाहापेक्षा वेगळया गोष्टी हाताळणाऱ्या शिबूने या वेळेसही कॉमेडी-सस्पेन्स-थ्रीलर अशा तिन्ही जॉनरला हात घालणारा हा एक अनोखा प्रयत्न केला आहे. शिबूच्या मते प्रेक्षकांना या सिनेमाद्वारे एक वेगळा अनुभव मिळेल. दिग्दर्शनासोबतच शिवदर्शनने हेमराज साबलेंच्या साथीने या सिनेमाचं लेखनही केलं आहे.

अभिजीतसोबत या सिनेमात निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आणि सुरेंदर पाल आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना अनुराग गोडबोले याने स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचं एक वैशिष्टय म्हणजे शिबूचे वडील देवदत्त साबळे यांनी ४० वर्षांपूर्वा लिहिलेलं आणि संगीतबद्धकेलेलं एक गाणं प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये ऐकायला मिळणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते कॉस्च्युम डिझाइनर सचिन लोव्हलेकर यांनी या सिनेमातील व्यक्तिरेखांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. अपूर्वा मोतीवाले-सहाय आणि आशिष म्हात्रे यांनी संकलन, तर कॅमेरामन प्रदिप खानविलकर यांनी छायालेखन केलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *