Breaking News

कृषी विभागातील ‘या’ पदासाठी १५ दिवसात जाहिरात, अब्दुल सत्तार यांची घोषणा २ हजार रिक्त पदे भरणार

कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करुन कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात येईल. या पदभरतीची जाहिरात येत्या १५ दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

विधानपरिषदेत सदस्य सतिष चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री सत्तार म्हणाले, राज्यात कृषी विभागात कृषी सहायकांची ११ हजार ५९९ पदे मंजूर असून फेब्रुवारी-२०२३ अखेरपर्यंत ९ हजार ४८४ पदे भरलेली आहेत तर २ हजार ११५ पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांच्या एकूण मंजूर पदसंख्येचा विचार करता हे रिक्त पदांचे प्रमाण १८ टक्के आहे. कोविड काळात वित्तिय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर निर्बंध होते. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाने हे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत पदे भरण्यास मुभा देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी सहायकांची एकूण १४३९ पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल. पेसा कार्यक्षेत्रातील पदभरतीसंदर्भात राज्यपालांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. उर्वरित पदभरतीची कार्यवाही तत्काळ करण्यात येईल, असे मंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.

कृषी सहायक हे पदनाम बदलून ते सहायक कृषी अधिकारी असे करण्याची मागणी आहे. याबाबत संबंधित संघटना आणि राज्य शासन यांची बैठक घेऊन येत्या १५ दिवसात याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या पदोन्नतीबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती मंत्री सत्तार यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात दिली.

यावेळी सदस्य अभिजीत वंजारी, विक्रम काळे, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा.राम शिंदे यांनी उपप्रश्न विचारले होते.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *