Breaking News

द्राक्ष हंगामाचं बिगुल वाजलंय, शेतकऱ्यांनो सावध रहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या सुरक्षतेसाठी आवाहन करणारा अभिजित झांबरे यांचा लेख

साधारण मे, २०११ सालची गोष्ट असावी, तासगाव तालुक्यातील बिरणवाडी या गावातील द्राक्षउत्पादक शेतकरी कै.निवास महादेव मोरे यांच्या कुटुंबासोबत घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. निवास मोरे हे त्यांच्या द्राक्षशेतीत काबाडकष्ट करुन आपल्या संसाराचा गाडा हाकीत होते. तसा त्यांचा कोणाशी वैरभाव नव्हता, त्यामुळे परिसरात एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. एके दिवशी हे द्राक्षशेतकरी कुटुंब नेहमीप्रमाणे आपले रात्रीचे जेवण करुन झोपी गेले. परंतु ती रात्र त्यांच्या कुटुंबासाठी मोठी काळरात्र ठरली. कारण रात्रीच्या जेवणातील अन्नातून त्या सर्वांना विषबाधा होऊन त्या कुटुंबातील चौघा जणांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता. अन्नातील विषारी औषधाच्या घातक परिणामुळे त्यांच्या कुटुंबातील चौघा जणांचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्नही त्यांच्यासाठी अपुरे ठरले. या घटनेमुळे तासगाव तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. यामागे कोणता घातपात आहे का ? हे सामूहिक आत्महत्येचं प्रकरण तर नाही ना ? अशा विविध तर्कांनी या प्रकरणाची खूप चर्चा झाली.
शेवटी पोलीस तपासाअंती हे स्पष्ट झाले की मोरे कुटुंबीयांचा निष्काळजीपणाच त्यांच्या घातास कारणीभूत ठरला आहे. कारण मोरे कुटूंब त्यांच्या द्राक्षशेतीसाठी लागणाऱ्या औषधांचा साठा त्यांच्या स्वयंपाक घरातील भांड्याच्या कपाटाशेजारी ठेवत होते, आणि घरातील महिलांनी स्वयंपाक करताना तेलाची बाटली समजून तशाच स्वरुपाच्या बाटलीतील औषध जेवणात मिसळले गेले होते. हेच औषध मोरे कुटुंबाच्या गोतास काळ ठरले होते.
खरं तर ही घटना केवळ एक उदाहरण म्हणावे लागेल, या सारख्या अनेक छोट्या-मोठया विषबाधेच्या घटना या राज्यभरात घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. त्याची माहिती जर गोळा केली तर मोठा आकडा समोर येईल. बऱ्याचदा या घटनांच्या मुळाशी गेल्यावर आपल्या शेतकरी मित्रांचा निष्काळजीपणाच दिसून येतो. गतवर्षी अशाच पध्दतीने विदर्भ आणि मराठवाड्यातील ५१ हून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विषबाधेमुळे आपला जीव गमवावा लागला होता. अशा घटनांतून आपल्या द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी देखील बोध घेणे गरजेचे आहे.
सध्या राज्यभरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढत आहे, पाठोपाठ द्राक्षबागेवरील रोगांचे नियंत्रण करण्यासाठी विषारी औषधांचा वापर देखील प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बरेच शेतकरी तर एकदाच हंगामासाठीच्या सर्व औषधांचा साठा करुन ठेवतात. परंतु त्या औषधांपासून स्वतःची व आपल्या कुटुंबाची नीट काळजी घेताना दिसत नाहीत. अनेकदा शेतकऱ्यांकडून फवारणीनंतर वापरुन झालेल्या किंवा अर्धवट राहिलेल्या औषधांच्या बाटल्यांची व पिशव्यांची योग्य विल्हेवाट न लावता तशाच इत्ररत्र शेताच्या बांधावर, अंगणात, घरावर, उकिरड्यावर अथवा माळरानावर फेकून दिल्या जातात. त्यापैकी लहान मुलांनी खेळताना एखादी बाटली जरी चुकून तोडांला लावली तरी मोठी दुर्घटना घडू शकते, तसेच उघड्यावरील बाटल्या जनावरांनी, किंवा रानातील प्राणीमात्रांनी खाल्ल्याने त्या निष्पापांना आपला हकनाक जीव गमवावा लागतो.
बऱ्याचदा तर आपले शेतकरी फवारणीसाठीचे औषध तयार करताना योग्य काळजी घेताना दिसत नाहीत, औषध तयार करताना ते हातानेच ढवळणे, तशाच हाताने तंबाखू मळून खाणे, औषध फवारताना तोंडाला रुमाल न बांधणे, पुर्ण अंग न झाकता चड्डी, बनियन यासारखे अर्धवट कपडे घालून औषधांची फवारणी करणे, औषध फवारणीनंतर साबणाने स्वच्छ हातपाय स्वच्छ न धुणे, अंघोळ न करणे अशा चुका कळत-नकळत शेतकऱ्यांकडून केल्या जातात. त्यामुळे या चुकांचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.
ही औषधे इतकी घातक आहेत की त्वचेवरील रेंध्रामधून या औषधांचा अंश शरीरात उतरतो. काही वेळा या औषधांचा परिणाम लगेच जाणवत नसला तरी स्लो पॉईझनिंगच्या रुपाने पुढील काळात त्याचे वाईट परिणाम शरीरावर होऊ लागतात. त्याचे परिणाम म्हणून भूक मंदावणे, धाप लागणे, वजन कमी होणे, केस गळणे, चेहरा व शरीर काळवंडणे, हात थरथरणे, झटके येणे यासारखे परिणाम दिसू लागतात. तर कॅन्सर सारखा रोग देखील उद्भविण्याची शक्यता असते.
त्यामुळे या साऱ्या घटनांचा आणि परिणामांचा विचार करुन शेतकऱ्यांनी आपली वैयक्तीक तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. काय होतंय असल्या औषधानं म्हणून कोणी अतिशहाणपणा करीत असेल तर त्या शेतकऱ्यांना शेवटी इतकंच सांगणं आहे की कदाचित तुम्ही तुमच्या जीवावर उदार झाला असाल परंतु तुमच्यावरती अवलंबून असणारे तुमचे म्हातारे आई-वडील, तुमची पत्नी, सोबतच तुम्ही घरी परत कधी येताय याकडे डोळे लावून बसणारी तुमची लहान मुलं या सर्वांचा एकदा जरुर विचार करा आणि येत्या हंगामात व इथून पुढे विषारी औषधांपासून तुमची योग्य ती काळजी घ्या.
शेवटी इतकी रिस्क घेऊन आपण द्राक्षशेती करतो कशासाठी आणि कुणासाठी , जर आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहणार असेल तरच या साऱ्या द्राक्षशेतीला काय अर्थ आहे. अन्यथा त्यापेक्षा दोनवेळेचं पोट आरामशीर भागेल अशा शाळू, हायब्रीडचा हुर्डा फुकून खाल्लेला काय वाईट आहे.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *