Breaking News

मुख्यमंत्र्यांमुळे गृहनिर्माण मंत्री आणि राज्यमंत्री बेदखल राज्यातील गृहनिर्माणाचा आढावा घेणे झाले बंद

मुंबईः प्रतिनिधी
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे या योजनेखाली राज्यात गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात नसल्याबाबत केंद्रीय गृहनिर्माण विभागाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. परंतु गृहनिर्माण विभागातील प्रत्येक गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष घालत असल्याने या विभागाचे मंत्री प्रकाश महेता आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर हेच बेदखल झाल्याचे चित्र गृहनिर्माण विभागात झाले आहे. तसेच या दोन मंत्र्यांकडूनही स्वतःच्या मतदारसंघातील एसआऱए आणि म्हाडा पुर्नविकास प्रकल्पांच्याबाबत आढावा बैठकी घेण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नसल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्यात सत्तांतर झाल्यापासून सुरुवातीचे काही महिने वगळता गृहनिर्माण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रत्येक निर्णयात, धोरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यातच गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होवून त्यांच्या विरोधात चौकशी सुरु आहे. त्यामुळे मंत्री महेता यांनी गृहनिर्माण विभागाच्या कामातून लक्ष काढून घेण्यास सुरुवात केली. तर राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तर सुरुवातीपासूनच फक्त स्वतःच्या मतदारसंघातील पुर्नविकास प्रकल्पांच्या संदर्भात बैठका घेवून प्रश्न मार्गी लावण्यात रस घेत आहे. तसेच या दोन्ही मंत्र्यांकडून मतदारसंघातील प्रकल्पा व्यतिरीक्त इतर प्रश्नांबाबत विचारणाही केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
गृहनिर्माण विभागाचे पूर्वीचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह हे असताना त्यांच्याकडून सतत गृहनिर्माण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, धोरणात्मक बाबी, विविध मोठे प्रकल्प याबाबत सातत्याने आढावा घेत. तसेच विभागातील सर्व अधिकाऱ्यांची तीन महिन्यात किंवा दोन महिन्यात एकदा तरी बैठक घेत होते. परंतु आताचे प्रधान सचिव या पध्दतीचे कोणतेही काम करत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विभागावर मंत्र्यांचेच नियंत्रण राहीले नाही. तसेच प्रत्येक धोरणात्मक आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री कार्यालयातूनच गृहनिर्माण विभागाकडे थेट प्रस्ताव येतात. त्यामुळे गृहनिर्माण विभागही त्यांनाच उत्तर देतो. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातून जेवढ्या फाईली येतात त्यावर निर्णय घेतला जातो. गृहनिर्माण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांकडे फक्त सह्यांसाठी सर्व फाईली जातात. मात्र त्या फाईंलींवर निर्णय घेण्याचे अधिकार या दोन्ही मंत्र्यांना नसल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.
गृहनिर्माण विभागात मुख्यमंत्र्यांच्या या अती लक्ष घालण्यामुळे ना धड गृहनिर्माण विभागातील कामांना गती येईना ना धड राज्यातील घर उभारणीच्या कामाला गती येत नसल्याची भावना गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *