Breaking News

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे यादी प्रसिध्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत देत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

नागपूर : प्रतिनिधी

मागील अधिवेशनात घोषणा करूनही राज्यातील बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच याप्रश्नी जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार रात्री १२.३० वाजेपर्यंत विधानसभा रोखून धरल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी नुकसान भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले.

राज्यातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. त्यावर विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव दाखल करत चर्चा केली होती. यावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री स्व. पांडूरंग फुंडकर यांनी शेतकऱ्यांना एनडीआरएफकडून मदत न मिळाल्यास राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा पुर्नरूच्चार विरोधी पक्षांनी केला. तसेच सध्या मांडण्यात आलेल्या २९३ अन्वयेवरील प्रस्ताव मांडताना त्याचा उल्लेख केला होता. मात्र कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी पुन्हा जुनेच उत्तर देत असल्याचे निदर्शनास आणून देत याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावे अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे उत्तर देत नाहीत तोपर्यंत सभागृह सोडणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत विधानसभा रोखून धरली. तरीही मुख्यमंत्र्यांनी उत्तर न दिल्याने मध्यरात्री विधानसभेच्या आवारात धरणे आंदोलनही केले.

अखेर आज मंगळवारी त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोंडअळी, तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना तीन पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या पद्धतीत विमाची होती, यात १२ हजार प्रति हेक्टर मदत देण्यात आली आहे. एनडीआरएफचे पैसे यायचे आहेत. त्यामुळे राज्याकडून १३ हजार ५०० रूपयांची मदत देण्यात येत आहे. बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेळ लागेल असे सांगत याप्रकरणी १४ लाख अर्ज आले. त्यातील ८ लाख ८ हजार अर्जाची सुनावणी पूर्ण झाली. त्यातील १ लाख ५५ हजार अर्ज निकाली काढून ते बियाणे कंपन्यांकडे पाठवल्याची माहिती दिली.

तसेच बोंडअळीच्या पीक विम्याचे पैसे ४४ लाख पैकी ३८ लाख शेतसकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. तसेच शेतकऱ्यांना १२ हजार प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिलेली आहे. केंद्राकडून एनडीआरएफची मदत यायला वेळ लागेल म्हणून एसडीआरएफमधून पैसे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर विरोधी पक्षनेते विखे-पाटील आणि अजित पवार यांनी त्यांची यादी प्रसिध्द करणार का असा सवाल केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *