Breaking News

शिक्षक भारती संघटनेचा इशाराः मुंबई बँकेत खाते नाही म्हणून शिक्षकांचे पगार थांबवू नका

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुंबईतील शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याची वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देयके मुंबईतील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी ऑनलाइन पाठवली. अधिदान व लेखा कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक यांनी मेन पूल अकाउंट उघडण्याचा आग्रह केला, तर पगार वेळेवर होणार नाही. यासाठी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी शिक्षण उपसंचालक यांना पत्र देऊन मेन पूल अकाउंटसाठी नियमित पगार थांबवू नका अशी मागणी केली.

५ डिसेंबर २०२३ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेत ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने या निर्णयाला विरोध दर्शवला. तसेच नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी मुंबईतील शिक्षकांचे पगार पूर्ववत ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नाला उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार खाते कोणत्या बँकेत असावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच आहे असे स्पष्ट सांगितले. तसेच शासनाचे मेन पूल अकाउंट वित्तीय वर्ष २०२३-२४ साठी मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे हे स्पष्ट केले.

त्यानंतर शासनाने १९ डिसेंबर २०२३ रोजी नवीन शासन निर्णय पारित करून मुंबई बँकेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार उघडण्याबाबत सक्ती नसल्याचे स्पष्ट केले. परंतु आता शासनाने शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. मेन पूल अकाउंट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक तारखेला होणारा शिक्षकांचा पगार थांबवू नये अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी केली.

Check Also

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *