Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करा नका

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या शंकांचं निरसन करून आमचं सरकार कायदेशीर ठरवलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली. नॉर्मली मी बघत नाही पण आज मी पत्रकार परिषद पाहिली. त्यामध्ये ते असं म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे की भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? याचं उत्तर द्या. खरं म्हणजे नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये. कारण तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडलात आणि एकनाथ शिंदेंनी विचारांकरता खुर्ची सोडली. एकनाथ शिंदे सत्तेत होते ते विरोधी पक्षासोबत आले. त्यामुळे नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

उद्धवजी तुमच्या लक्षात आलं होतं की तुमच्याकडे संख्याबळ नाही. तुम्ही हरणार आहात. लोकं तुम्हाला सोडून गेले आहेत. त्या लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिलात. विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करु नका. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *