Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चेहऱ्याचे नंतर पाहू आधी एकत्रित येणे महत्वाचे.. राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले...

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सध्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, तसेच आघाडीचा चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

संविधानाची ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी घ्यायला हवी असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

यावेळी शरद पवार म्हणाले, जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली तशी आणखी लोकांना आली आहे. आम्ही वाट बघतोय अजून कधी आणि केव्हा येईल. सत्तेचा गैरवापर हा सातत्याने केला जातो आहे हे उत्तम उदाहरण असून आम्ही त्याविरोधात लढू असा इशाराही यावेळी दिला.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत ओढलेल्या ताशेऱ्यावर शरद पवार बोलताना म्हणाले, राज्यपालांची निवड किती चुकीची केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि जाहीरपणाने त्यावर ते इथे असताना बोललो आहे. संविधानात राज्यपाल हे एक इन्स्टिटयुशन आहेत. त्याची अप्रतिष्ठा कशी केली जाते याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले. सुदैवाने ते आज इथे नाहीत. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही असे स्पष्ट सांगतानाच राज्यपालांची निवड करताना जी काळजी घ्यावी लागते ती काळजी न घेता जाणीवपूर्वक तिथल्या स्थानिक अन्य राष्ट्रीय विचारांचे लोकप्रतिनिधींना किंवा संस्थेला त्रास कसा होईल ही भूमिका घेऊन या नियुक्त्या केल्यानंतर हे घडत आहे. त्याचेच उदाहरण आपण महाराष्ट्रात पाहिले असा थेट हल्लाबोलही पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

न्यायालयाच्या निकालानंतर भाजपाविरोधात प्रचार करणे सोपे होणार आहे असे सांगतानाच ज्यांच्या नावाने निवडून येता त्या पक्षाचा आदेश महत्वाचा असतो. काही निर्णय अजून व्हायचे आहेत. त्यामुळे नैतिकता आणि भाजपाचा काही संबंध आहे, असे वाटत नाही असा उपरोधिक टोलाही शरद पवार यांनी लगावला.

माझा महाराष्ट्र दौरा सुरुच राहणार असून आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करू असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

Check Also

अरविंद केजरीवाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालय २९ एप्रिलला सुनावणी घेणार

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अटक रद्द करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *