Breaking News

बावनकुळेंच्या मिशनला अमोल कोल्हे यांचे प्रत्युत्तर, बोललं म्हणून फारसा फरक पडत नाही.. सुप्रिया सुळे यांचे काम बोलतं

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उस्ताह संचारला आहे. त्यामुळे या उत्साहाच्या भरात पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतही आता शिरकाव करण्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन बारामतीची घोषणा केली असून सुप्रिया सुळे यांना नवे वायनाड शोधावे लागेल असा इशाराही दिला. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, सुप्रिया सुळे यांचे काम बोलते, कोणी काहीही बोललं म्हणून फारसा फरक पडत नाही अशा सूचक शब्दात बावनकुळे यांना उत्तर दिले.

बावनकुळेंच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता अमोल कोल्हे म्हणाले की, “सुप्रिया सुळे ह्या आमच्या पक्षाच्या लोकसभेतील नेत्या आहेत. संसदेतील सदस्यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार दिला जातो, सुप्रिया सुळेंना ‘महासंसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांची कामगिरी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे.

शेवटी त्यांचं काम बोलतं, इतर कुणी काहीही बोललं तरी याने फारसा फरक पडत नाही. जनता सुज्ञ आहे. जनतेनं सातत्याने सुप्रिया सुळेंवर विश्वास दाखवला आहे. हाच विश्वास जनता पुढेही १०१ टक्के कायम ठेवेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे सध्या कोणी काही बोलत असेल तर अजून बरंच पाणी पुलाखालून वाहून जायचं आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी बावनकुळे यांना लगावला.

यावेळी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला महत्त्वाकांक्षा असणं स्वाभाविक आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीच्या नाड्या आपल्या हातात असाव्यात किंवा आर्थिक राजधानीवर आपल्या पक्षाची सत्ता असावी, असं भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला वाटत असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही. मुंबईतील जनतेचं कल्याण झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबई अत्यंत महत्त्वाची आहे, हा विचार कायम मनात राहिला पाहिजे असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *