Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, तर मी ही माझ्या आमदारांना डांबून ठेवले असत… शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला शिंदे गटाला आणि भाजपाला इशारा

मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आक्रमक पध्दतीने उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची पर्यायाने उध्दव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी शिवाजी पार्कवरील नियोजित दसरा मेळाव्यातही आडकाठी आणण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी स्वतंत्र अर्ज केला. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे म्हणाले की, माझीही ममता बॅनर्जी यांच्याशी ओळख आहेच की. मलाही वाटलं असतं तर त्या आमदारांना डांबून ठेवलं असतं. मी ही त्यांना कामाख्या मंदीर दाखविलं असतं असा टोला शिंदे गटाला लगावला.

शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी आधी परवानगी मागणारे पत्र दाखल करण्यात आलं असून शिंदे गटानं त्यानंतर शिवाजी पार्कवर मेळावा करण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, शिवसेनेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून बीकेसीमध्ये दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरु केल्याचे सांगण्यात येत असून यासंदर्भात एमएमआरडीएला पत्रही देण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी दिली.

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन, असा सूचक इशाराही दिला.

मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे ३०-४० आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो, असही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कोलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आम्हीच खरी शिवसेना असा दावा करण्यासोबतच शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा सांगितला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना काही दिवसांवर येऊन ठेपलेला दसरा मेळावा शिंदे गटाचाच होणार, असं सांगायला शिंदे गटातील नेतेमंडळींनी सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ भाजपामधूनही शिंदे गटाचाच दसरा मेळावा व्हायला हवा, असा दावा केला जात आहे. पोलिसांनी मात्र अद्याप दोन्ही अर्जांवर निर्णय दिलेला नाही.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *