Breaking News

जलसंधारण विभागाचे प्रणेते अरुण बोंगीरवार यांचे निधन मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी वाहीली श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुक्ष्म जलसंधारण प्रकल्पाची कामे सुरु करत त्यासाठी स्वतंत्र संकल्पनेच्या माध्यमातून जलसंधारण विभागाचे प्रणेते ठरलेल्या आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राहीलेले अरुण बोंगीरवार यांचे आज शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत. त्यांच्यावर मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९६६ च्या तुकडीचे अधिकारी असलेले बोंगीरवार हे सचोटी आणि निर्णायक नेतृत्त्वगुणामुळे सर्वदूर परिचित असे उत्तम प्रशासक होते. भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक तरुण अधिकाऱ्यांचे ते मार्गदर्शक होते. त्यापैकी अनेक जण सध्या राज्य प्रशासनात सचिव व अन्य महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पंचविसावे मुख्य सचिव म्हणून काम पाहताना राज्याच्या विकासात योगदान दिले.

दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेतृत्त्वाखालील सरकार असताना मुख्य सचिव म्हणून काम करण्याची त्यांना विरळी संधी मिळाली. दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

पुणे महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी त्यांच्या कार्यशैलीतील वेगळेपणाचा ठसा उमटवला.

पर्वती भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचा पहिला प्रकल्प राबविला. झोपडीधारकांना जागेवरून न हटवता त्यांचे केलेले पुनर्वसन हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी पाया घालून दिलेल्या या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रारूपाची आजही राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी केली जाते.

दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे सचिव असताना मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सूक्ष्म जलसंधारण प्रकल्पांची सुरुवात करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या या कल्पनेतूनच पुढे जलसंधारण हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला.

त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर येथे सहा वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले तसेच  औरंगाबाद, पुणे आणि कोकण येथे विभागीय आयुक्त म्हणूनही काम पाहिले. महसूल विभागातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचे संचित म्हणून त्यांनी महसूल प्रशासनावरील बोंगीरवार समिती अहवाल सादर केला. या अहवालाची सरकारने नुकतीच अंमलबजावणी केली. त्यानुसार शहरी भागात वाढलेल्या महसुली कामासाठी अनेक नव्या तलाठी सजांची निर्मिती करण्यात आली.

ते मूळ विदर्भातील होते. त्यामुळे विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी समयोचित आर्थिक तरतूद आणि विदर्भातील उद्योगांसाठी तेथील खनिज संसाधनांचा विकास करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी मराठवाड्यातील अनेक उद्योजक आणि लघुद्योगांना प्रोत्साहन दिले. यापैकी अनेक उद्योग आजघडीला राज्यातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहेत.जेएनपीटीचे अध्यक्ष असताना त्यांनी तेथे पहिल्यावहिल्या खासगी सागरी टर्मिनलची उभारणी केली.

समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. मग ती व्यक्ती खेड्यातून आलेली असो की शिपाई असो की विविध पक्षांचे राजकीय नेते असोत. त्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी ते पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करीत.

कुशल प्रशासक हरपला : मुख्यमंत्री

राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या निधनाने एक द्रष्टा आणि कुशल प्रशासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. बोंगिरवार यांना प्रशासकीय यंत्रणा व कार्यपद्धतीची अचूक जाण होती. या यंत्रणेचे खंबीरपणे नेतृत्त्व करतानाच तिचे लोकांप्रती असलेले उत्तरदायित्वही अधिकाधिक वाढावे यासाठी त्यांची धडपड होती.

 

कर्तृत्वान अधिकारी गेला-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

राज्याचे माजी मुख्य सचिव अरूण बोंगीरवार यांच्या निधनाने एक कर्तृत्वान अधिकारी आणि कुशल प्रशासक गेल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी श्रध्दांजली वाहताना व्यक्त केली.

 

 

Check Also

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *