Breaking News

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात पत्नीची भागीदारी असलेल्या कंपनीवर मेहेरनजर

मुंबईः प्रतिनिधी
एसआरएचे सीईओ म्हणून कार्यरत असताना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील हे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यावर संशयाची सुई आली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबई उपनगराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून विश्वास पाटील हे कार्यरत असताना जुहू येथील एका झोपडपट्टीच्या पुर्नविकासाचा प्रस्ताव एसआरएकडे आला. त्यावेळी संबधित प्रकल्प विकासकासोबत विश्वास पाटील यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे भागीदारी करार करत सदर प्रकल्पाचे काम त्याच विकासकाला देण्यात शासकिय पदाचा गैरवापर केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.
वास्तविक पाहता शासनातील महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला कुटुंबियातील व्यक्तींच्या नावे एखादी कंपनी अथवा कंपनीतील भागीदारी असेल तर तशी माहिती राज्य सरकारला देणे बंधनकारक आहे. मात्र विश्वास पाटील यांनी यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच पदाचा गैरवापर करत पत्नीची भागीदारी असलेल्या कंपनीला एसआरए प्रकल्पाचे काम दिले. तसेच या भागीदारीच्या बदल्यात विश्वास पाटील यांनी जुहू येथील एसआरए पुर्नविकसित इमारतीत तीन ते चार सदनिकाही घेतल्याचे उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात कारवाईला सुरुवात होत असतानाच दरम्यानच्या काळात मंत्रालयाला आग लागली आणि त्याची नस्ती त्यात जळून खाक झाली. त्यानंतर यासंदर्भात २०१७ साली एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने यासंदर्भात माहिती मागत या प्रकरणाला वाचा फोडली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा प्रशासनाच्या नजरेसमोर आले असून यावरील पुढील कारवाई करण्यासाठी सामान्य प्रशासनाचे सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे विश्वास पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर कारवाई लवकरच होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *