Breaking News

सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा बाल हक्क आयोगाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल

मुंबई : प्रतिनिधी

स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना जसलोक रुग्णालयात अविवाहित असल्याचं खोटं शपथपत्र सादर करुन सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत.

प्रकाश भोस्तेकर आणि त्यांची पत्नी शुभांगी भोस्तेकर यांना पाच आणि १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. मात्र मुलगा होत नाही म्हणून पती प्रकाश आणि सासू लक्ष्मी भोस्तेकर यांच्याकडून नेहमी छळ होत असल्याची तक्रार शुभांगी यांनी केली होती. मुलगा होण्यासाठी माझ्यावर अनेक प्रयोग केल्याचंही त्यांनी तक्रारीत नमूद केलं होतं. याबाबत मुंबईतील मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

नवरा, सासू हे आपल्याला मुलगा व्हावा म्हणून वेगवेगळ्या मार्गाने मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचं शुभांगी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. यासाठी अनेक वेळा दबाव टाकून गर्भपाताचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही शुभांगी यांनी केला होता.

पतीने जसलोक हॉस्पिटलमध्ये नेऊन शुभांगी यांच्या तपासण्याही करुन घेतल्या होत्या. परंतु शुभांगी यांनी सरोगसीला ठाम नकार दर्शवला. माझ्यावर जसलोकमध्ये झालेल्या चाचण्यासुद्धा त्याच हेतूने झाल्याचा आरोप शुभांगी यांनी तक्रारीत केला. तसंच याबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी पतीने आपणास धमकावल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर सासरच्यांनी शुभांगी यांचा सातत्याने छळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे घटस्फोटाची मागणी सुरु केली. परंतु त्यांची तब्येत साथ देत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. शुभांगी यांना दोन लहान मुली असल्यामुळे त्या पुन्हा आरोग्यास हानीकारक उपचार करुन घेण्यासाठी नकार देत होत्या. त्यानंतर पती प्रकाश भोस्तेकर यांनी जसलोक हॉस्पिटल मध्ये जाऊन आपण अविवाहित असल्याचे दाखवून सरोगसीद्वारे मूल हवी असल्याची विनंती डॉ. फिरोजा पारीख यांना केली.

पत्नीला अंधारात ठेऊन पती प्रकाश भोस्तेकर यांनी सरोगेट मदर उपलब्ध करुन घेतली आणि उपचार सुरु केले. २० सप्टेंबर २०१६  रोजी सरोगेट आईच्या माध्यामातून प्रकाश भोस्तेकर यांनी मुलाला जन्म दिला.

या छळाला कंटाळून २७ सप्टेंबर २०१६ रोजी मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये शुभांगी यांनी तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी जसलोक हॉस्पिटलच्या डॉ. फिरोजा पारीख तसंच अनोळखी डॉक्टर आणि वार्डबॉय यांच्याबद्दल तक्रार गांभीर्याने घेतली नसल्याचंही शुभांगी यांनी बालहक्क आयोगाकडे म्हटलं होतं. याबाबत फसवणुकीची कारवाई करावी म्हणून या विषयाची सुनावणी बाल हक्क आयोगासमोर सुरु होती.

शुभांगी भोस्तेकर यांच्या वतीने प्रसिद्ध विधीज्ञ राम जेठमलानी यांच्या सहकारी अॅड. सिद्धविद्या युक्तिवाद करत होत्या. प्रकाश भोस्तेकर यांनी रुग्णालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबाबत फसवणुकीचा, तर दोन मुली असताना पत्नीला अंधारात ठेऊन मुलांच्या भवितव्याशी धोकादायक वर्तणूक केल्याप्रकरणी बाल न्याय अधिनियमातील कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरोगसीविषयी कायदा अजून अस्तित्वात नसल्याने अखिल भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी शिफारसही आयोगाने केली आहे. अशा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या या प्रकाराबद्दल शासनाने त्वरित विशेष तपासणी पथक (SIT) बनवण्याची शिफारसही आयोगाने केली आहे. अखिल भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वावर कार्य केले जात आहे की नाही, याबाबत तपास करण्यासाठी एसआयटीची त्वरित स्थापना करण्याचे निर्देशही आयोगाने केले आहेत.

 

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *