Breaking News

जमीन, पशू धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे होणार मुल्यांकन

राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत होणार पाहणी

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीत कुटुंबाची जमीन, पशू धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मुल्यांकन पाहणी करण्यात येणार असून ही पाहणी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत संपन्न होईल. राज्यातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक र. र. शिंदे यांनी केले आहे.
राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास केंद्रीय राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या नवी मुंबई स्थित कार्यालयातील उप महानिदेशक सुप्रिया रॉय यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
ही पाहणी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार असून वरील विषयाबरोबरच कर्जे व गुंतवणूक या विषयाची देखील माहिती घेतली जाणार आहे. या पाहणीअंतर्गत शेतकरी कुटुंबांचे आर्थिक राहणीमान, त्यांच्या ताब्यात असलेली जमीन, पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र, त्यापासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी होणारा खर्च, या पिकांना मिळणारी आधारभूत किंमत, सिंचनाचे स्त्रोत, शेतकरी कुटुंबाकडे असलेले पशुधन व त्यापासून मिळणारे उत्पन्न, यासारखी माहिती गोळा करण्यात येईल. तर दुसऱ्या विषयाच्या अनुषंगाने ग्रामीण व नागरी भागाकरिता निवड केलेल्या कुटुंबाकडे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, त्यांच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्ता आणि दायित्वे (व्यवसायासह) याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येईल. या पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील विविध धोरणे आखण्यासाठी तसेच नियोजनासाठी केला जातो. त्यामुळे या पाहणीसाठी अचूक आणि परिपूर्ण माहिती देणे गरजे आहे, ती देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *