Breaking News

महाराष्ट्राला १५ पंतप्रधान पुरस्कार ११ वर्षात ८ योजनांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळाले

नवी दिल्ली : प्रतिनिधी

लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला  ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या नागरी सेवा दिनी पंतप्रधानांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे करण्यात येते. सन २००६ पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

ठाणे शहराचे बदलते स्वरूप ते प्रधानमंत्री पीक विमा योजना

महाराष्ट्राला मिळालेल्या प्रधानमंत्री पुरस्काराचा प्रवास हा ठाणे व नागपूर शहराचे बदलते स्वरूप ते पंतप्रधान पीक विमा योजना असा आहे. सन २००६ सालचा पहिला पंतप्रधान पुरस्कार हा डॉ.टी. चंद्रशेखर यांना मिळाला, त्यांनी ठाणे व नागपूर शहराचा केलेला कायापालट देशात उल्लेखनीय ठरला.

याच वर्षी कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुरू केलेला राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण अभियान कार्यक्रम देशात उल्लेखनीय ठरला, या उपक्रमासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख व महावीर माने यांना प्रधानमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नदीजोड प्रकल्पासाठी विजय सिंघल यांना पुरस्कार

जळगाव येथे नदीजोड प्रकल्प कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांना सन २००८ या वर्षाचा प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला तर २००९ साली मलकापूर शहरासाठी चोवीस तास पाणी प्रकल्प उल्लेखनीय ठरला, हा उपक्रम यशस्वीरित्या राबविणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र होलानी व त्यांच बरोबर अभियंते सदानंद भोपळे, यशवंत बसुगडे, उत्तम बगाडे यांना पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले.

कृषी आयुक्तालयास पंतप्रधान पुरस्कार

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तत्कालीन आयुक्त विजय नाहटा यांनी राबविलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र या उपक्रमास सन २००९ यावर्षीचा पुरस्कार मिळाला तर महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तालयास सन २०१२ सालाचा पुरस्कार मिळाला. कृषी आयुक्तालयाने राज्यात कीटक पर्यवेक्षण व कीटक व्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे राबविला होता.

कौशल्य विकासासाठी चार जणांना पुरस्कार

आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी तरुणांना कौशल्य विकासाची योजना राबविल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी रंजीत कुमार, अभिषेक कृष्णा, टिकेएस रेड्डी व वाय. एस शेंडे यांना सन २०१३-१४ यावर्षांचा पंतप्रधान पुरस्कार देण्यात आला. सन २०१७ यावर्षी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आजपर्यंत २०१ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार

सन २००६ ते २०१७ या कालावधीत देशातील २०१ अधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन २००६-२००७ या वर्षी सर्वाधिक ६१ अधिकाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले तर २०१३-१४ या वर्षी २७ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

 

Check Also

५ लोकसभा मतदारसंघातील १,४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *