Breaking News

जनता निषेधात तर दलित केंद्रीय मंत्री आत्मचरित्र पुस्तक प्रकाशनात मग्न दलित संघटनांच्या महाराष्ट्र बंदकडे दस्तुरखुद्द केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंची पाठ

मुंबई : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे मानवंदना देण्यासाठी गेलेल्या दलित समाजावर काही समाजकंटकानी दगडफेक केली. त्या निषेधार्थ राज्यातील सर्व दलित संघटना, डाव्या पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र दलित समाजातीलच असलेले आणि स्वत:ला दलितांचा नेता म्हणवून घेणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आपल्या आत्म चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशनाचे वेध लागले असून त्याची निमंत्रण पत्रिका सर्व सोशल नेटवर्कींग साईटवरून सर्वांना पाठविण्याचा अश्लाघ्य प्रकार सुरु आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच ते संपूर्ण देशभरात ते स्वत:ला दलितांचे नेते म्हणूनच परिचित आहेत. मात्र त्यांच्या राजकिय जीवनावरील लेखांचे आत्मचरित्रात्मक पहिलेच पुस्तक राजीव सुमन आणि प्रमोद रंजन याद्वयीने लिहीले आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून विशेषत: एकाबाजूला दलित संघटना आणि राजकिय पक्षांकडून बंद पुकारला असताना आठवले मात्र पुस्तक प्रकाशनासाठी दिल्लीला जावून कार्यक्रमाची पुर्व तयारी करण्यात गुंतल्याची माहिती पुढे आली आहे.

भीमा कोरेगांव येथे झालेल्या अन्यायाच्या विरोधात दलित समाज पक्षानिवेश बाजूला ठेवून त्यासंदर्भातील आक्रोश बंदच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. त्याच समाजाचे नेते स्वत:चा उदोउदो करणारे पुस्तक प्रकाशित करण्याचे कृत्य करत आहेत. यावरून या नेत्याचा समाजाप्रती कोडगेपणा दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दलित समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी आपल्यावरील ३ जानेवारी २०१८ रोजीचा पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पुढे ढकलणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी हा कार्यक्रम तसाच ठेवून त्यासाठी स्वत: जातीने हजर राहण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत. राज्यातील दलित समाज भीमा कोरेगांव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ आपला आक्रोश व्यक्त करण्यात गर्क आहे. तर याच दलित समाजाचा नेता स्वत:चा उदो उदो करणाऱ्या पुस्तक प्रकाशनात मग्न असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *