Breaking News

कोकणप्रेमींना ‘रेडू’ नक्कीच आवडेल ! दिग्दर्शक सागर वंजारी यांचं मत

‘रेडू’ असं आगळंवेगळं शीर्षक असलेला मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून चित्रट महोत्सवांपासून पुरस्कार सोहळ्यांपर्यंत सर्वच ठिकाणी कौतुकास पात्र ठरत आहे. या चित्रपटाद्वारे सागर वंजारी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. सागरच्या या पहिल्याच चित्रपटाला राज्य पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. १८ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या निमित्ताने सागरशी मराठी e-बातम्या या संकेतस्थळाचे खास प्रतिनिधी संजय घावरे यांनी साधलेला संवाद…

………………………..

 सागर, तुझ्या आजवरच्या प्रवासाबाबत काय सांगशील?

– लहानपणापासून मला तांत्रिक गोष्टींमध्ये फार उत्सुकता वाटायची. त्यातून मी अनेक उद्योग करून बघायचो. पुढे जाऊन चित्रपटाविषयी ओढ निर्माण झाली, तेव्हा त्याच्या तांत्रिक गोष्टींमध्ये रमलो. त्यामुळे शॉर्टफिल्म्सचं एडिटिंग करू लागलो. गेली १२ वर्षं मी एडिटिंग करतोय. या काळात मी जवळपास १८० शॉर्टफिल्म्स एटिड केल्या आहेत. त्यातील ५० हून अधिक शॉर्टफिल्म्सना महोत्सवांमध्ये पुरस्कारही मिळाले आहेत. जयप्रद देसाईसारख्या दिग्दर्शकाशी शॉर्टफिल्ममुळेच परिचय झाला.

 

लघुपटांच्या एडिटींगकडून चित्रपटांकडे कसा वळलास?

– एका डॉक्युमेंटरीचं काम करताना मला एके दिवशी रत्नाकर मतकरींचा फोन आला. ते इन्व्हेस्टमेंट नावाचा चित्रपट करत होते. मतकरी हे मराठी नाट्यसृष्टीतील फार मोठं नाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडून चित्रपटाचं स्क्रीप्ट मागून घेतलं. ते वाचल्यावर कळलं, की हा फार वेगळा चित्रपट आहे. मग त्याचं एडिटिंग करायला मिळालं. तो चित्रपट माझ्यासाठी लर्निंग एक्स्पिरिअन्स होता. एडिटिंगच्या पलीकडे जाऊन चित्रपट डीआय कसा होतो वगैरे सगळं तिथं शिकायला मिळालं. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटानं मला खूप आत्मविश्वास दिला. त्यानंतर ‘घनचक्कर’ या हिंदी चित्रपटाचं मेकिंग केलं. तेलुगू, मैथिली, मराठी अशा भाषांमधील चित्रपट केले. त्यानंतर मला ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट करायला मिळाला. त्या चित्रपटापर्यंत मला पटकथा चांगल्या रितीनं समजू लागली होती. मात्र, प्रसाद नामजोशीमुळे त्यातले बारकावे कळले, सौंदर्यदृष्टी कळली. त्या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.

 

दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय कसा घेतलास?

– चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्येकाला कधी ना कधी आपण दिग्दर्शन करावं असं वाटत असतंच. तसं माझ्याही मनात होतं. त्यामुळे दिग्दर्शनाकडे वळलो.

 

रेडूच्या निर्मितीबाबत काय सांगशील?

– निर्माते नवलकिशोर सारडा चित्रपटाची पटकथा घेऊन आले. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचं लेखन केलं होतं. त्या गोष्टीतला निरागसपणा मला भावला. गोष्टीला युनिव्हर्सल अपल होतं. चित्रपटात १९७०चा काळ आहे. त्यामुळेही तेही आव्हानच होतं. मात्र, त्याचवेळी असं वाटलं, की गोष्ट कोकणात, मालवण परिसरात घडली तर जास्त मजा येईल. त्यामुळे मी लेखक मित्र चिन्मय पाटणकरशी बोललो. चिन्मयनं ‘रंगा पतंगा’ची कथा लिहिली होती. तो कोकणातलाच आहे, त्याला मालवणी येते हे माहीत होतं. त्यामुळे त्याला पटकथा पाठवली आणि मालवणीत रुपांतर करण्याविषयी विचारलं. त्यानं पटकथा वाचून तयारी दर्शवली. त्यातले चार-पाच सीन्स करून पाठवले. त्यानं केलेलं रुपांतर पहिल्याच प्रयत्नात आवडलं होतं. मग त्यानं मूळ पटकथेत काही बदल केले, संवाद नव्यानं लिहिले. मुळात त्यानं पटकथेत मालवणी संस्कृती आणली. त्यानंतर आम्ही दोघांनी काही सीन्स लिहिले. अभिनेता शशांक शेंडे यांनीही काही गोष्टी सुचवल्या. त्यातून ही मालवणी पटकथा साकारली. मालवणी बोलीत एक गोडवा आहे, तो यात आला. कोकण म्हटलं की ज्या टिपिकल गोष्टी, उदाहरणार्थ पाऊस, आंबा, दशावतार हे सगळं या चित्रपटात आम्ही टाळलं. हे सगळं करताना छाया कदम, शशांक शेंडे, चिन्मय, संगीतकार विजय गावंडे, गुरू ठाकूर या सगळ्यांचीच मदत झाली. चित्रपटाचं मालवणी रुपांतर करण्याचा निर्णय आम्ही निर्मात्याना न सांगता घेतला होता. त्यामुळे लातूरला जाऊन त्यांना चित्रपटाची पटकथा वाचून दाखवली  त्यांनाही ती आवडली. त्यानंतर चित्रीकरण सुरू केलं  चित्रीकरण करतानाच लक्षात येत होतं, की काहीतरी वेगळं आणि चांगलं घडतंय.

 

रेडूचं वेगळेपण काय?

– रेडू हा मालवणी बोलीतला चित्रपट आहे. आजपर्यंत मालवणी बोलीत एखादा अपवाद वगळता फिचर फिल्म झाली नाही. मालवणी व्यक्तिरेखा अनेक मालिका, चित्रपटांतून बघायला मिळतात. मात्र, त्या लाऊड आणि विनोदी असतात. ‘रेडू’ हा चित्रपट त्या पलीकडे जातो. ‘रेडू’ एका मालवणी माणसाची साधी निरागस गोष्ट सांगतो. कोकणाचा खराखुरा, निसर्गरम्य अनुभव देतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातले शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल वगळता बाकी सगळे कलाकार तिकडचेच आहेत. त्यामुळे एक रॉनेस या चित्रपटात आहे.

 

कैरो आंतरराष्ट्रीय महोत्सव, कोलकाता आंतरराष्ट्रीय महोत्सव, अरविंदन पुरस्कार असे मानसन्मान या चित्रपटाला मिळाल्याने मनात कशा प्रकारची भावना आहे?

– पहिल्याच चित्रपटाला एवढे मान-सन्मान मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे. कोलकात्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. कैरोला प्रेक्षकांना प्रचंड आवडला. अनेकांनी मुद्दाम भेटून त्याबद्दल सांगितलं. त्यावेळी लक्षात आलं, की आपला चित्रपट भाषेच्या पलीकडे जाऊन भावनिक स्तरावर प्रेक्षकांशी जोडला जातोय. औरंगाबाद तर प्रेक्षक अक्षरश: वेडे झाले होते. इफ्फीमध्येही तसाच अनुभव होता.

 

रेडूप्रेक्षकांनी का पाहावा?

– या सिनेमात आम्ही एक साधी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय. एका रेडिओमुळे एका माणसाचं आयुष्य कसं बदलतं हे चित्रपटात पहायला मिळेल. रेडिओवरचा हा भारतातला दुसराच चित्रपट आहे. या पूर्वी तमीळमध्ये रेडिओपेट्टी नावाचा सुंदर चित्रपट झाला होता. कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला रेडू नक्की आवडेल. कारण यात कोकणाचा निसर्ग आहे, तिथली माणसं आहेत, तिथलं जगणं आहे, तिथली संस्कृती आहे. यात विनोद आहे, यात भावना आहेत, संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल असा हा ‘रेडू’ आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *