Breaking News

पडळकरांची पवारांवर खोचक टीका, त्यांना लेकीची अन् नातवाची काळजी… अहिल्यादेवींच्या जयंतीदिवशीच चौंडीत पवार विरूध्द पडळकर-खोत संघर्ष

त्यांचा बुरखा फाडण्यात आम्ही गेल्या दोन वर्षात यशस्वी झालो आहोत. त्यांना आता आपल्या लेकीची, नातवाची काळजी लागली आहे. पुढे त्यांना लोक जोडायचे आहेत. आम्ही या महापुरुषासाठी काहीतरी करत आहोत असं दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हिंदू आहे हे म्हातारपणी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हनुमान मंदिरात जाऊन माझ्या राजकारणाच्या प्रचाराचा नारळ फोडतो हे सांगावं लागतं. किती वाईट वेळ आली आहे अशी खोचक टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यावरून पवार विरुद्ध पडळकर असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने चौंडीत सभेचं आयोजन करण्यात आले. रोहित पवारांनी दिलेल्या निमंत्रणानंतर शरद पवारदेखील उपस्थित होते. शरद पवार तब्बल नऊ वर्षांनंतर म्हणजे ८ सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच जयंती सोहळ्यास चौंडीत आले आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजात तीव्र असंतोष आहे, त्याची झळ राष्ट्रवादीला बसली. त्यानंतर आता त्यांनी धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचे पाऊल उचलल्याचे मानलं जात आहे.

दुसरीकडे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होत आहे. मात्र पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखल्याने रस्त्यावरच समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला. अखेर दोन तासांनी पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली.

सर्व भाडोत्री आणलेला जनाधार आहे. जनाधार दिसत आहे तर मग मला कशाला थांबवलं? ही रोजगाराने आणलेली लोकं, पक्षातील लोक तिथे उपस्थित आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

गोपीचंद पडळकर रडणारा नाही तर लढणारा आहे. लोकशाहीत कायद्याला हे महत्व देत नाहीत, वागत नाहीत. पण मी तक्रार करणार नाही. वाघाला दगड मारल्यानंतर तो चवताळून दगड मारणाऱ्याच्या नरडीचा घोट घेतो. तुम्ही जर आमच्या इतिहासाशी छेडछाड करत असाल, अहिल्यादेवींच्या प्रेरणास्थानवार घाव घालत असाल तर बहुजनांची मुलं तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी आम्ही काय दहशतवादी आहोत का? असा सवाल करत शरद पवार आल्यानेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

याआधी कधी राष्ट्रवादीच्या नावे जयंती झाली नाही. सर्वसमावेश जयंती साजरी होती. याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? जयंतीला का आला नाहीत? का दर्शनासाठी येथे आला नाहीत? आता तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि आमचं ऊर्जास्थान तयार झालेल्या चौंडी येथे तुम्हाला हल्ला करायचा आहे. आमचा इतिहास तुम्हाला बुजवायचा आहे, बहुजनांचे लचके तोडायचे आहेत म्हणून हा घाट घालता. शरद पवार आणि त्यांच्या नातवाने कार्यक्रमाला गालबोट का लावलं आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महाराष्ट्रात याआधी असं घडलं होतं का? राष्ट्रवादीच्या नेत्यांना याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *