Breaking News

पर्यटन विभागाच्या रिसार्टवरच मंत्री रावल यांचा अवैध कब्जा तोरणमाळ हिल रिसॉर्टप्रकरणी मंत्री रावलांची हकालपट्टी करण्याची मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यात आरोप प्रत्यारोपच्या फैरी झडत असतानाच नोटाबंदीच्या काळात मोदी सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या दोन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या मालकीचे असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्टवरच कब्जा केल्याचा दुसरा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

तसेच या रिसॉर्टवरील कब्जा बेकायदा पध्दतीचा असून यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून मंत्री रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँलार्ड पिअर्स येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सन १९९१ मध्ये एमटीडीसीकडून तोरणमाळ हिल रिसॉर्टने तोरणमाळ हिल भाडयाने घेतले. त्यानंतर १९९६ मध्ये ५ वर्षासाठी करार करण्यात आला. परंतु त्यानंतर पुन्हा २००१ ते २००६ पर्यंत १० वर्षासाठी भाडेकराराने घेतले. परंतु त्याचे भाडे भरण्यात आलेले नाही. उलट कंपनीने एमटीडीसीकडे ६० लाख खर्च झाल्याची मागणी केली. त्यानंतर एमटीडीसीने २०११ मध्ये सक्षम अधिकाऱ्यामार्फत भाडे भरा नाही तर जागा खाली करा, अशी नोटीस पाठवली. परंतु हे सांगण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर गावगुंडाच्या मदतीने हल्ला करण्यात आला. तोरणमाळ हिल रिसॉर्ट ही कंपनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबांच्या मालकीची आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

नोटबंदीच्या काळामध्ये आरओसीने जाहीर केलेल्या काळया यादीमध्ये ही तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा.कंपनी आणि डेव्हलपर्स या दोन कंपन्यांचा समावेश आहे. २७ जुन २०१७ ला डी रजिस्टर करण्यात आले. तोरणमाळ गावामध्ये सातबारामध्ये जयकुमार रावल यांचे नाव आहे. याबरोबरच जयकुमार रावल यांचे झोबा.कॉमवर दहा कंपन्यामध्ये चेअरमन असल्याचे दिसून येत आहे. या मंत्र्यांचे ४ डीन नंबर असून हे रिसॉर्ट कार्यरत आहे की नाही याची माहिती घेतली असता आज तोरणमाळ हिल रिसॉर्टमध्ये प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ७ हजार रुपये भरुन ऑनलाईन बुकींग केले. त्यावेळी हे रिसॉर्ट सुरु असल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा एक पर्यटनमंत्री आपल्याच विभागाच्या एमटीडीसीचा रिसॉर्ट काबीज करतो. त्यामध्ये दारुचाही व्यवसाय करतो. रिसॉर्ट बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवतो, चेअरमन म्हणून काम करतो, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यायचा. परंतु मुख्यमंत्री राजीनामा घेणार नाहीत. जयकुमार रावल यांची ते पाठराखण करत असून आम्ही जयकुमार रावल यांच्या कारनाम्याचे कागदपत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवत असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.

मोदी सांगत आहेत आम्ही खोदकाम सुरु केले आहे परंतु त्यांचे काम आम्ही कमी करत आहोत. आम्ही खोदकाम सुरु केलेल्यांवर कारवाई कधी करता आणि हे प्रकरण ईडीकडे कधी पाठवणार असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी केला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *