Breaking News

मंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्वे’ ठरवून द्या राज्यपाल कोश्यारींचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी

नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता, त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते- तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे केली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अश्या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले. आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे अश्या आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात मंत्री पदाची शपथ देताना काही सदस्यांना आपण शपथ ‘लिहिली आहे त्याच स्वरुपात कुठलीही नावे न जोडता’ पुन्हा वाचण्याची सूचना केली होती याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे. शपथेच्या प्रारूपापासून फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या स्तरावर विचार विनिमय करून सर्व संबंधितांना योग्य सूचना / मार्गदर्शक तत्वे देऊन शपथ विधी प्रक्रियेचे पावित्र्य जतन करण्याची विनंती राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे उभय पीठासीन अधिकार्‍यांना केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *