Breaking News

तर फडणवीस व पाटलांनी भाजपा खासदाराच्या “त्या” वक्तव्याचा खुलासा करावा राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबदद्लची भूमिका महाराष्ट्र भाजपाला मान्य आहे का ?-अतुल लोंढे

लाऊडस्पिकरच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील भाजपाने साथ दिली आहे आणि त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी भाजपाचे उत्तर प्रदेश सरकार रेड कार्पेट स्वागत करण्यात मग्न आहे. मात्र उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंनी जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्याचे राजकारण केले आहे. रेल्वे परिक्षेला आलेल्या उत्तर भारतीय परिक्षार्थ्यांना मारहाण केली, फेरीवाले, पाणीपुरी विकणारे, फळे भाजी विकणाऱ्या गोरगरिब उत्तर भारतीयांनाही मारहाण केली. राज ठाकरेंनी आज हिंदुत्वाची पताका घेऊन हनुमान चालिसा, लाऊडस्पिकर, माहआरतीचे मुद्दे घेताच त्यांना महाराष्ट्र भाजपाने साथ दिला पण राज ठाकरेंची उत्तर भारतीयांबद्दलीच भूमिका महाराष्ट्र भाजपाला मान्य आहे का? भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंच्या माफीची मागणी केली केली आहे त्यावर राज्यातील भाजपा नेते फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय? हे जनतेला समजले पाहिजे अशी ते म्हणाले.
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, या शहरात येऊन रोजीरोटी कमावण्याचा सर्वांना संविधानिक अधिकार आहे, त्याचे रक्षण केवळ काँग्रेस पक्ष व काँग्रेस सरकारनेच केले आहे. केवळ मतांसाठी रामाचे, हनुमानाचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपाने एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभे केले. रवी राणा, नवनीत राणा, राज ठाकरे या बी टीमना भाजपाने पुढे करून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे काम केले आहे. मतांच्या स्वार्थासाठी काहीही करणाऱ्या भाजपाने राज ठाकरेंची नवी भूमिका व त्यांच्याच पक्षाच्या खासदाराने केलेला विरोध यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *