Breaking News

मुख्यमंत्र्यांनी सांगितली, शाहु महाराज आणि प्रबोधनकारांच्या ऋणानुबंधाची आठवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रम

प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. हा महामानव होता. शाहू महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. असं वाटतं की त्यांना आणखी आयुष्य मिळालं असतं तर आज राज्याचं चित्र वेगळ असतं. पायाभूत सुविधांच्या बाबतीत नाही तर समाज सुधारणेच्यादृष्टीने वेगळं चित्र असतं अशी भावना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला शाहू महाराजांची आठवण होत नसेल असा एक ही दिवस नसेल त्यांनी जगावं कसं, कोणासाठी जगावं, कसं जगावं याची दिशा आपल्या कार्यातून दाखवली. अशी दिशा दाखवणारी माणसं आता होणार नाहीत.
आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना छत्रपती शाहू महाराजांचे १०० व स्मृतीवर्ष साजरं करत आहोत. अस्पृश्यांचा उद्धार, शिक्षण प्रसार, धरणे, वसतिगृहे, कृषी, उद्योग क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे.
हा दूरदृष्टी असलेला राजा, आज या कामासाठी वेगवेगळे विभाग आहेत पण या सगळ्या खात्यांचे काम एका माणसानं केलं. स्वातंत्र्याचे वारे वहात असतांना अनेक राजे होऊन गेले. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले असेही अनेकजण होते. पण शाहू महाराज हे गादीवर बसलेले राजे नव्हते. या राज्याने सातत्याने दीनदुबळ्यांसाठी काम केलं, त्यांच्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्य वर्गाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी संघर्ष केला. याचा उल्लेख प्रबोधनाकारांनी आपल्या पुस्तकात केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले पाहिजेत, ते देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलं ते मार्गदर्शक आहे. शाहू महाराजांनी भेटीला बोलावल्याचा निरोप आजोबांना (प्रबोधनकारांना) आल्यानंतर ते तत्काळ तिकडे गेले. भेटायला बोलावल्यानंतर सुक्ष्म नजरेने ते समोरच्या माणसाला पारखायचे. आजोबांना (प्रबोधनकारांना) लिखाणासाठी आवश्यक असलेले संदर्भ शाहू महाराजांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शाहू महाराज हे लोकोत्तर राजा त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असले पाहिजे हे वचन होतं.
आज जी वृत्ती दिसते आहे त्याच्याविरोधातच शाहू महाराज लढले. आजोबांकडून जे ऐकले, मी वाचले त्यावरून दिसतं की छत्रपती शाहू महाराज कोणत्या व्यक्ती विरोधात नव्हते तर वृत्तीविरोधात होते असेही त्यांनी सांगितले.
वंचित वर्गासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं. शिक्षणातील भेदभाव दूर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतांना त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढं जाऊया. आपण त्यावर काम करत आहोत. शिक्षण, उद्योग, धरणं, सामाजिक समता यासाठी आपण निर्णय घेत आहोत. ज्या वृत्तीविरोधात महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात लढले ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढू या, सामाजिक समता स्थापित करूया. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. शाहु महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल. प्रत्येक शाळेत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर होण्यासाठी शाहू महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे असेही त्यांनी यावेळी प्रशासनाला निर्देश दिले.

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *