Breaking News

तुरूंगातून बाहेर पडताच सत्यजीत चव्हाण यशवंतराव प्रतिष्ठानवर, शरद पवार म्हणाले…. माती परिक्षण थांबविल्याशिवाय आणि फौजफाटा हटविल्याशिवाय बारसूप्रकरणी चर्चा नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी रविवारी (३० एप्रिल) ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते.

शरद पवार म्हणाले, बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

बारसू प्रकल्पाचे सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून, पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू, असा इशारा प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते सत्यजित चव्हाण यांनी दिला. तसेच आमच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाईल, अशीही भूमिका चव्हाण यांनी शुक्रवारी २८ एप्रिल मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली होती. यावेळी रिफायनरीविरोधी संघटनेचे (बारसू-सोलगाव पंचक्रोशी) सरचिटणीस नरेंद्र जोशी आणि अध्यक्ष वैभव कोळवणकर उपस्थित होते.

सत्यजीत चव्हाण म्हणाले होते, कोकण विकासाचे मॉडेल हे आमच्याच म्हणण्याप्रमाणे अपेक्षित आहे. कोकणामध्ये विकास करताना पेट्रोकेमिकल झोन तयार करणारे, मानवासह निसर्गाला हानी करणारे प्रकल्प नकोत. यासंदर्भात राज्य सरकारला वारंवार निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे यांनी अद्याप भेट दिलेली नाही. एक रिफायनरी प्रकल्प झाल्यास भविष्यात इतर धोकादायक प्रकल्प उभे राहतील. त्यामुळे प्रदूषणात वाढ होईल.

रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून तेथील पाच गावांतील ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेचे ठराव या प्रकल्पाविरोधात आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी चार हजारांहून अधिक ग्रामस्थ बारसू सोलगावच्या सड्यावर उपस्थित आहेत. हे ग्रामस्थ बाहेरून आलेले नसून आजूबाजूच्या गावातील स्थानिक आहेत. रिफायनरीमुळे त्यांच्या गावावर परिणाम होणार असल्याने त्यांनीही विरोध केला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *