Breaking News

व्यासंगी पण कामाप्रती निष्ठा ठेवणारे व्यक्तीमत्वः मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या बद्दल भावना व्यक्त करणारा उपसचिव अजित देशमुख यांचे मनोगत

राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. सुमारे सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ सनदी सेवेनंतर सर सेवानिवृत्त होत आहेत. प्रशासकीय सेवेतील हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या कामातून उच्च प्रतीचे प्राविण्य सिद्ध केलेच पण या परिघाबाहेर आपल्या कलासक्त, स्थितप्रज्ञता, क्षमाशीलता सुसंस्कृतता, सहनशीलतेच्या परमोच्च गुणांचं विलोभनीय दर्शन देवून आपले वेगळेपण-एकमेवाद्वितीयत्व सिद्ध केले आहे. मनुकुमार श्रीवास्तव यांचे पिताश्री भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने प्रशासनाचे बाळकडू त्यांना मिळालेले होतेच. एक सदाबहार, चिरतरुण, राजबिंड व्यक्तिमत्व असलेले श्रीवास्तव प्रशासनातील एक दंतकथा बनलेले आहेत.

मला आदरणीय श्रीवास्तव सरांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात सुमारे अडीच वर्षे काम करण्याचा योग आला. मी पूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित दादांबरोबर कार्यरत असल्याने दादांच्या कामांच्या माध्यमातून सरांशी जुजबी परिचय होता. सरांच्या कामाच्या प्रचंड व्यासंगाबाबत खूप ऐकलं होतं. प्रत्यक्ष काम करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आणि कंगोरे जवळून अनुभवायला मिळाले. कामावरील त्यांच्या जाज्वल्य निष्ठेबरोबर त्यांच्यातील सुसंस्कृत, नम्र व्यक्ती मला अधिकच भावली. सचिव किंवा त्यापेक्षा उच्च पदावर काम करायचं म्हणजे संपूर्ण राज्यासाठी प्रशासकीय विभागाचे नेतृत्व करण्याचा योग असतो. विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना त्या व्यक्तीच्या कार्यशैलीचे प्रतिबिंब ओघानेच विभागाच्या कामकाजावर आणि संबंधित शेवटच्या माणसाच्या भवितव्यावर पडत असते. बऱ्याचदा असा समज आहे की चांगला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी व प्रशासनावर नियंत्रण आणण्यासाठी वेळप्रसंगी निर्दयी, कठोर व्हावे लागते. पण सरांनी आपल्या कृतीतून हा सिद्धांत फोल ठरवला आहे.

ना तेरी शान कम होती, ना तेरा रुतबा घटा होता
जो घुस्से मे कहा तूने जरा हसकर कहा होता

श्रीवास्तव सरांनी अधिकाऱ्यांसाठी नेहमीच आपल्या भाषणातून हा संदेश दिलेला आहे. परंतु केवळ सांगण्यापुरताच नाही तर आजीवन सरांनी त्याचं अत्यंत काटेकोरपणे पालन केले आहे. परिस्थिती कितीही गंभीर असो, बिकट असो, कसोटीची असो. सरांनी धीरोदात्तपणें आपली जबाबदारी स्वीकारून, आपल्या तत्वांशी प्रतारणा न करता स्थितप्रज्ञतेने , संयम ढळू न देता शांतपणे सर व्यक्ती किंवा प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत. परिस्थिती कशीही असो, कोणीही अधिकारी किंवा व्यक्ती त्यांच्या दालनातून कधीही अपमानित होऊन बाहेर पडलेला नाही ही सरांच्या उदात्तत्तेची ग्वाही देणारी बाजू आहे.

सनदी सेवेच्या पूर्वार्धातच त्यांनी धुळे जिल्हा परिषदेत धर्म भास्कर वाघाचा कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस आणला. आपल्या कामाचा दर्जा त्यांनी सेवेच्या उत्तरोत्तर काळात उंचावतच नेला. कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास मुख्य कार्यकारी अधिकारी ,मुंबई महानगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त , मंत्रालयात नगर विकास, महसूल-वने ,गृह खात्यांचे अशा अनेक महाकाय व संवेदनशील खात्यांचे सचिव म्हणून काम आणि शेवटी मुख्य सचिव म्हणून काम करताना त्यांनी आपले काम चोख बजावून पदांची गरिमाच वाढवलेली आहे. अक्षरशः पहाटे तीन चार वाजेपर्यंत काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत कामाला रुजू होण्याचे एक ना अनेक दिवसांचे विक्रम सरांच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे सकाळचे ताजेतवाने, उत्साही, प्रसन्नमुद्रेचे साहेब, रात्री-पहाटेचे साहेब आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळचे साहेब जसेच्या तसे. मी तरी सरांना कधी आळसाची जांभई देताना पाहिलेले नाही. अक्षरशः नियमितपणे, १५-१५ तास अव्याहतपणे काम करण्याची सरांची क्षमता त्यांना लाभलेली दैवी देणगीच आहे. कामांचा कितीही व्याप असो, समोर आलेला प्रत्येक कागद अत्यंत बारकाईने वाचून त्यात सुधारणा सह सकारात्मक मूल्यवृद्धी करूनच तो कागद- धारिका पुढे सरकवत असत. सरांचा मराठी शब्दसंग्रह तर अचंबित करणारा आहे. संकल्पित, परामर्श असे एक ना अनेक शब्द हे सरांनी मंत्रालयाच्या कार्यप्रणालीला देणगी दिलेले आहेत.

सरांनी नियमित कामकाजाचा दर्जा उंचावण्याबरोबरच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित विभागाचे कायदे-नियम यात अभ्यासपूर्ण सुधारणा केल्या. सरांच्या मार्गदर्शनातून आणि सहभागातून तयार झालेले शासन निर्णय परिपत्रके न्यायालयीन शपथपत्रे किंवा इत्यादी कामकाज साहित्य हे सर्वार्थाने परिपूर्ण आणि शब्दसमृद्धीने नटलेले असत.

मनुकुमार श्रीवास्तव हे एक कलासक्त व्यक्तिमत्व आहे. विशेषतः ते मुकेशच्या गाण्यांचे दर्दी आहेत. कामाचा व्याप आटोपून मध्यरात्री-पहाटेपर्यंत नियमितपणे संगीत साधनेसाठी वेळ देण्याची त्यांची कसरत खरोखरच थक्क करणारी आहे. किंबहुना सरांना अव्याहतपणे कार्यरत राहण्याची ऊर्जा आणि शक्ती यातूनच मिळत असावी.

कितीही घाई गडबड असो,कितीही बिकट परिस्थिती,असो शांत-स्थितप्रज्ञ राहून काम करणे हा सरांचा अतिविशेष स्थायीभाव आहे. त्याचे उत्तम दर्शन आम्हाला अनेक प्रसंगांतून वेळोवेळी झाले. महसूल विभागाच्या मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनासंदर्भात विभागाने काय कार्यवाही केली याचा आढावा घेण्यासाठी आश्वासन समितीची बैठक होत असते. एकदा एका आमदार महोदयांनी कदाचित त्यांचे हितसंबंध दुखावले गेले असल्यामुळे जाणवण्या इतपत सरांना आश्वासनाच्या मुद्द्यावरून मुद्दाम धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सरांच्या संयमाची फार मोठी कसोटी त्यावेळी लागली होती. परंतु सरांनी अत्यंत शांतपणे उत्तरे दिली. सरांची थोडी नामुष्की झाली ही वस्तुस्थिती होती. सरांच्या सहनशीलता आणि क्षमाशीलतेची आणि स्थितप्रज्ञतेची प्रचिती त्यावेळी आम्हाला अधिक प्रकर्षाने आली.

आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर सरांचे नाते हे अत्यंत आपुलकीचे आणि औपचारिकतेच्या पलीकडचे होते. एकदा मी माझ्या पत्नी-मुलीसह सरांना मंत्रालयात भेटलो. त्यांनी माझ्या कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझी मुलगी अनुष्का सरांचे दर्शन घेण्यासाठी पुढे झाली सर तात्काळ मागे सरकले. आपल्या संस्कृतीत मुलगी ही लक्ष्मीचे रूप असते. तिला दर्शन घेऊ देणे चुकीचे आहे. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्यातील खोलवर रुजलेल्या संस्कृतपणा, सभ्यता या मूल्यांचे ते विलोभनीय दर्शन होते.

आदरणीय सरांनी सनदी अधिकारी म्हणून शासनाला दिलेल्या भरीव योगदानाची जाणीव ठेवून, त्यांच्यातील प्रगल्भ विद्वत्तेचा ठेवा उपयोगात आणण्यासाठी शासनाने त्यांची सेवा निवृत्तीनंतरही सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केलेली आहे. सरांना सेवानिवृत्ती नंतरचे जीवन आणि सेवा हमी आयुक्त पदाची नवीन इनिंग ही सुख, आरोग्य आणि भरभराटीची जावो याच त्यांना हृदयपूर्वक शुभेच्छा.

लेखक-अजित देशमुख, उपसचिव, महसूल विभाग

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *