Breaking News

संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला तर पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, माझे बोलणे झाले… देवेंद्र फडणवीसांना इशारा जास्त तोंड उघडायला लावू नका

उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेलाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांनी रविवारी अहमदनगरमधील छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याला संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं. तसेच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना महाविकास आघा़डीबाबत केलेल्या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमात बोलताना कुस्तीतील डोपिंग प्रकरणाची उपमा राजकीय घडामोडींना दिली होती. ज्याप्रकारे कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काहीजण नशा करून कुस्ती खेळायला लागले, तसेच राजकारणातही काहीजण सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पहिलवानांना कुस्तीमधून बादच व्हावे लागते, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं होतं. त्यावर आता संजय राऊत बोलताना म्हणाले, तुम्हाला पराभूत करण्याची नशा आहे. तुम्हीही नशा करा. आम्ही नशा करतो तो शुद्ध नशा आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय. तुमचं द्वेषाचं, सूडाचं राजकारण आहे. ती भांग अत्यंत वाईट, असा टोलाही लगावला.

तसेच संजय राऊत म्हणाले, मला त्यावर जास्त बोलायला लावू नका, नाहीतर तुमच्या आसपास नशेबाज लोक कोण आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते हे तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला महाविकास आघाडी, उद्धव ठाकरेंच्या सभांची, संजय राऊत बोलतात त्याची जी भीती वाटते, त्यातून तुम्ही अशी वक्तव्य करत आहात, असंही म्हणाले.

त्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी फडणवीसांना खोचक टोला लगावत म्हणाले, आम्हाला चोरून भेटण्याची गरज नाही. ते हुडी घालून चोरून कसे भेटत होते हे देवेंद्र फडणवीसांच्या घरातूनच सांगितलंय. कशाला आम्हाला तोंड उघडायला लावता? आम्ही उघडपणे जाऊ, उघडपणे भेटू. पण भाजपाबरोबर कोणतीही चर्चा सुरू नव्हती आणि नाही, असं म्हणाले.

शरद पवार यांच्यासंदर्भात संजय राऊतांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी. १ मे रोजी मुंबईत मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत, असंही म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्त्व यात आहे आणि ते राहणार. त्यांची इच्छा आहे की आपण तिघं एकत्र राहिलो, तर २०२४ साली आपण भाजपाचा पराभव करू, लोकसभाही मोठ्या संख्येनं जिंकू या शरद पवारांच्या भूमिका आहेत. मला अजिबात असं वाटत नाही की मविआसंदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल. आम्ही सगळेच सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी असं मला कधी वाटलं नाही, असं यावेळी सांगितले.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *